पांढरकवडा तालुक्यात वन्यप्राण्यांचा हैदोस
By admin | Published: June 22, 2017 01:11 AM2017-06-22T01:11:47+5:302017-06-22T01:11:47+5:30
तालुक्यातील वाऱ्हा, कवठा या शेतशिवारातील शेतीत नुकतीच पेरणी झाली असून रानडुकराने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे.
शेती करणे झाले कठीण : वन अधिकारी म्हणतात, ‘शेताचे स्वत:च रक्षण करा’
लोकमत न्यूज नेटवर्क $$्रिपांढरकवडा :
तालुक्यातील वाऱ्हा, कवठा या शेतशिवारातील शेतीत नुकतीच पेरणी झाली असून रानडुकराने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात मृगाच्या पूर्वाधातच चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. सोयाबीन व कपाशिच्या बियाण्याला अंकुर फुटले. काळी जमीन हिरवीगार झाली. आपली पेरणी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. परंतु वाऱ्हा, कवठा, अर्ली, चनाखा, बोथ, बहात्तर या भागात रानडुकरांचे कळपच्या कळप शेतात घुसून पिके उध्वस्त करीत आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व वनाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहे. दरवर्षी या भागातील शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांपासून शेतातील पिकांचे नुकसान होते. याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर वनमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. जंगल परिसराला लागून असेल्या या गावातील शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. वन विभागांच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असता, ते स्वत:च्या शेतातील पिकांचे स्वत:च संरक्षण करण्याचे सांगतात. परंतु पिकांचे संरक्षण करावे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. वन्यप्राणी शेतात घुसून शेतीचे नुकसान करीत असे, व शेतकरी त्या वन्यप्राण्यांना पिटाळून लावत असे, त्यात या प्राण्यांना कमी-जास्त झाल्यास वन विभागाचे कर्मचारी उलट शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल करतात. त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आले आहे. वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
सोयाबीन, तुरीचे पीक उद्ध्वस्त
कवठा येथील देवकाबाई नामदेव घडसनवार यांच्या शेतात पाच एकर जमिनीत पेरलेल्या सोयाबीन व तुरीच्या पिकाचे रानडुकराच्या कळपाने शेतात हैदोस घालून संपूर्ण पीक उद््ध्वस्त केले. कवठा शिवारात असलेल्या देवकाबाईच्या १.९२ हेक्टर शेतात त्यांनी सोयाबीन व तूर या पिकाची पेरणी केली. यामध्ये पाच बॅग सोयाबीन व १० किलो तुरीचे बियाणे पेरले. तसेच १० बॅग रासायनिक खतही दिले. त्यांनी बियाणे व खतावर १५ हजार ७०० रूपयांचा खर्च केला. परंतु रानडुकराचे कळप या शेतात घुसले आणि त्यांचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. जर हे पीक उद्ध्वस्त केले नसते, तर दीड लाखांपेक्षा जास्त उत्पन्न झाले असते. त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देवकाबार्इंनी तहसीलदार, वनाधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.