‘आरटीओ’ कार्यालयात पासिंगसाठी येरझारा

By admin | Published: March 19, 2017 01:24 AM2017-03-19T01:24:30+5:302017-03-19T01:24:30+5:30

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पासिंग करताना वाहनधारकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Heerzara for passing the RTO office | ‘आरटीओ’ कार्यालयात पासिंगसाठी येरझारा

‘आरटीओ’ कार्यालयात पासिंगसाठी येरझारा

Next

वाहनधारक त्रस्त : प्रत्येकदा दाखविल्या जातात नवीन त्रुट्या
यवतमाळ : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पासिंग करताना वाहनधारकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. आरटीओ कार्यालयापासून सात किलोमीटर अंतरावरील एमआयडीसी परिसरातील ट्रॅकवर वाहनांची ट्रायल घेतली जाते. तेथे प्रत्येकदा अधिकाऱ्यांकडून नवीन त्रुट्या दर्शवून वाहन मालकाला परत पाठविले जाते. त्यामुळे त्यांना पासिंगसाठी येरझारा घालाव्या लागत आहे.
माल व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना दरवर्षी आरटीओ कार्यालयातून फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागते. विशिष्ट कालावधीसाठी हे प्रमाणपत्र दिले जाते. त्या मुदतीपूर्वी वाहनांची आरटीओतील वाहन निरीक्षकांकडून तपासणी करून घ्यावी लागते. यासाठी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. एमआयडीसी परिसरातील आरटीओच्या ट्रॅकवर पासिंगसाठी वाहनांची मोठी रांग लागलेली असते. तेथे वाहनांची थेट नोंदणी केली जात नाही. त्याऐवजी वाहनांतील त्रुट्या बघून त्याची पूर्तता करण्याचे निर्देश दिले जातात.
त्रुट्यांची पूर्ततेनंतर पासिंगसाठी वाहन निरीक्षकांकडून आणखी काही त्रुट्या दाखविण्यात येतात. एकदाच काय त्रुट्या आहे, हे सांगितले जात नाही. प्रत्येक दिवशी येथील अधिकारी बदलत असल्याने वाहन मालकाची मोठी अडचण होते. खासगी कर्जावर घेतलेली वाहने पासिंगसाठी कित्येक दिवस उभी ठेवावी लागतात. फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपण्याच्या आठ दिवसांपूर्वीच वाहन नवीन प्रमाणपत्रासाठी तपासणीकरिता आणले, तरी मुदतीच्या आत पासिंग केले जात नाही. त्यामुळे वाहनधारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. पासिंगसाठी वाहने घेऊन अक्षरश: मुक्कामी राहावे लागते. पुसद येथील एका मालवाहू ट्रकची नंबर लावण्यावरून तोडफोड करण्यात आली. यामुळे वाहन मालकाचे मोठे नुकसान झाले. त्रुट्यांसाठी परत पाठविलेल्या वाहनाकरिता येथे स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यांना इतर वाहनांप्रमाणेच रांगेत लावावे लागते. प्रत्येकदा तपासणीचा क्रमांक येईपर्यंत वाट बघणे आणि नंतर त्रुटीसाठी परत जाणे, त्रुटी काढल्यानंतर पुन्हा रांगेत लागणे असा प्रकार सर्रास सुरू आहे.
आरटीओ कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी नसल्याने अनागोंदी निर्माण झाली आहे. फिटनेस प्रमाणपत्रावर स्वाक्षरीसाठी तब्बल एक महिना वाहन मालकाला येरझारा मारायला लावल्याचे प्रकरण नुकतेच चर्चेत आले होते. यावरुन विभागीय परिवहन अधिकाऱ्यांनी यवतमाळात येऊन चौकशीसुद्धा केली होती. त्यानंतरही येथील वाहन पासिंग व फिटनेस प्रमाणपत्र देण्यातील अनियमितता कायम असल्याचे वाहन मालकांकडून सांगण्यात येते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Heerzara for passing the RTO office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.