अल्फाबेटीकल यादीत अडली बोंडअळीची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:34 PM2018-06-22T22:34:03+5:302018-06-22T22:34:53+5:30
पेरणीचे दिवस असतानाही शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या रकमेसाठी बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहे. बोंडअळीची मदत जाहीर झालेली असताना केवळ अल्फाबेटीकलमुळे शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यात विलंब होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंगरखर्डा : पेरणीचे दिवस असतानाही शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या रकमेसाठी बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहे. बोंडअळीची मदत जाहीर झालेली असताना केवळ अल्फाबेटीकलमुळे शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यात विलंब होत आहे. नंबर लागला का हे पाहण्यासाठी मदतीस पात्र शेतकऱ्यांना येरझारा माराव्या लागत आहे.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जोडमोहा शाखेंतर्गत ५५ गावांचा समावेश होतो. या बँकेला बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या याद्या सादर झाल्या आहे. मात्र रकमेचे वाटप झालेले नाही. ही रक्कम मिळाल्यास शेतकऱ्यांना खरिपाच्यादृष्टीने मोठी मदत होणार आहे. मदतीसाठीच्या याद्या अल्फाबेटीकल तयार करून मदत दिली जाणार आहे. मदतीच्या लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने याला बराच कालावधी लागणार असल्याची चिन्हे दिसत आहे. किमान पाच ते सात दिवस हे काम पूर्ण व्हायला लागतील, असे बँकेकडून सांगितले जाते.
मदतीसंदर्भात बँकेचे संचालक बाबू पाटील वानखेडे म्हणाले, याद्या पूर्णपणे तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना पैशाचे वाटप केले जाणार आहे. बँक कर्मचाऱ्यांना यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मोहदा येथे मदतीच्या यादीत घोळ
मोहदा : तलाठी आणि डीटीपी आॅपरेटर्सच्या बेजबाबदारपणाचा फटका मोहदा परिसरातील बोंडअळीग्रस्तांना बसत आहे. निधी मंजूर झालेल्या यादीत नाव आहे मात्र त्यासमोर बँक खात्याचा तपशीलच भरलेला नाही. हा प्रकार आसोली या गावात अधिक प्रमाणात आहे. शिवाय या गावातील काही शेतकरी खातेदारांची नावे सर्वे होऊनही मदत निधीसाठी पाठविली गेली नाही. मदत मिळत असलेल्या शेतकऱ्यांनाही विविध कागदपत्र सादर करावी लागत आहे. बँक ते तलाठी या फेऱ्यातच शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.