अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 11:01 AM2021-10-20T11:01:26+5:302021-10-20T12:23:20+5:30
भीमराव काळबांडे याच्या पत्नीचे गावातीलच एका व्यक्तीसोबत गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते. मात्र, या संबंधात पतीचा अडथळा येत होता. त्यातून पती-पत्नीचे नेहमी खटके उडत होते.
यवतमाळ : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच झोपेत गळा आवळून प्रियकराच्या मदतीने खून केला. ही खळबळजनक घटना उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथे सोमवारी रात्री घडली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकरालाही ताब्यात घेतले आहे.
भीमराव उत्तम काळबांडे असे मृत पतीचे नाव आहे. उज्ज्वला काळबांडे आणि अनिरुद्ध लक्ष्मण काळबांडे अशी आरोपींची नावे आहेत. भीमराव काळबांडे याच्या पत्नीचे गावातीलच एका व्यक्तीसोबत गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते. मात्र, या संबंधात पतीचा अडथळा येत होता. त्यातून पती-पत्नीचे नेहमी खटके उडत होते. त्यामुळे त्याचा काटा काढण्याचा निर्णय दोघांनीही घेतला.
सोमवारी, १८ ऑक्टोबर रोजी झोपेत असलेल्या भीमरावचा गळा दाबून खून करण्यात आला. सकाळी आरोपींनीच गावात फिरून भीमरावने गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव केला. मात्र, गावकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली. पोलीस पाटील अनिल कांबळे यांनी घटनेबाबत बिटरगाव पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार प्रताप भोस, पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर लगेच सहायक पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर यांनीही भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.
घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी संशयावरून मृताची पत्नी व तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलिसी हिसका दाखविताच दोघांनीही गुन्हा कबूल केला. या दोघांवरही बिटरगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेण्यात आले, तर मृतावर सावळेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोन चिमुकले झाले पोरके
भीमराव आणि उज्ज्वलाच्या पोटी एक चिमुकला मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्य आहेत. मात्र, या घटनेनंतर त्यांचे वडील दगावले, तर आई तुरुंगात गेली आहे. त्यामुळे या चिमुकल्यांचे जीवन निराधार झाले आहे. खुनानंतर आरोपींनी आत्महत्येचा केलेला बनाव पोलिसांनी अवघ्या चार तासांत खोडून काढत आरोपींना ताब्यात घेतले.
हा तपास पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ, सहायक पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रताप भोस, उपनिरीक्षक कपिल मस्के, पोलीस हवालदार रवी आडे, मोहन चाटे, रवी गीते, सतीश चव्हाण, नीलेश भालेराव, स्वप्निल रायवाडे, गजानन खरात, देवीदास हाके, विद्या राठोड, सुनीता शिंदे, चंद्रकांत वाढवे, होमगार्ड सचिन यमजलवाड यांनी पार पाडला.