रस्त्यावर झाड कोसळल्यास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:31 PM2018-06-03T23:31:39+5:302018-06-03T23:31:39+5:30
पावसाळ्यात कुठे वादळाने रस्त्यावर झाड कोसळल्यास ते हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तत्काळ मदत उपलब्ध होणार आहे. यावर्षीपासून शासनाने सुरू केलेल्या द्विवार्षिक देखभाल-दुरुस्ती कंत्राटाचा हा चांगला परिणाम मानला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पावसाळ्यात कुठे वादळाने रस्त्यावर झाड कोसळल्यास ते हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तत्काळ मदत उपलब्ध होणार आहे. यावर्षीपासून शासनाने सुरू केलेल्या द्विवार्षिक देखभाल-दुरुस्ती कंत्राटाचा हा चांगला परिणाम मानला जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यात वादळामुळे वेगवेगळ्या रस्त्यावर झाडे उन्मळून पडतात. कुठे विद्युत पोल आडवे होतात. त्यामुळे तासन्तास वाहतूक ठप्प राहते. अनेकदा रात्रीच्यावेळी अपघातही होतात. आतापर्यंत कुठे झाड पडल्याची माहिती मिळाल्यानंतर बांधकाम अभियंते ते झाड उचलण्यासाठी कंत्राटदार शोधत होते. त्यांची मनधरणी करावी लागत होती, त्या आठ-दहा तास सहज निघून जात होते. तेवढा वेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत होती. हे प्रकार टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने आता द्विवार्षिक देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट दिले आहेत. या दोन वर्षात त्या-त्या मार्गावरील पडलेली झाडे उचलणेच नव्हे तर तातडीने खड्डे भरणे, झाडोरा काढणे आदी कामेही होणार आहे. शुक्रवारी यवतमाळ-दारव्हा रोडवर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली होती.
मात्र द्विवार्षिक कंत्राटामुळे संबंधित कंत्राटदाराने जेसीबीसह घटनास्थळी पोहोचून रस्ता मोकळा करून दिला. पावसाळ्यात जिल्ह्यात राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावर तातडीने ही मदत मिळणार आहे. इतर जिल्हा मार्ग मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने तेथे अशा प्रकारची तातडीची मदत मिळविण्यासाठी मात्र पूर्वी प्रमाणेच तासन्तास प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
बांधकाम विभागात ‘वॉर रूम’
पावसाळ्यात राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावर झाड पडणे, पूल खचणे, पोल पडणे या सारखी आपत्ती आल्यास तातडीने मदत मिळावी, म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या यवतमाळ, पुसद, पांढरकवडा, विशेष प्रकल्प विभाग यवतमाळ तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. १ यवतमाळ येथे कार्यालयात ‘वॉर रुम’ सुरू करण्यात आले आहे. तेथे बांधकाम अभियंते तैनात राहणार आहे. प्रत्येक वॉर रुममध्ये चार ते पाच जणांना नियुक्त करण्यात आले.
५६ कोटींचे कंत्राट
यवतमाळ जिल्ह्यात राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी दोन हजार ६६५ किलोमीटर एवढी असून त्याच्या द्विवार्षिक देखभाल-दुरुस्ती कंत्राटाचे बजेट ५६ कोटी रुपयांचे आहे. एकूण ११६ कामांचे कंत्राट यातून देण्यात आले आहे.