माणुसकीच्या भिंतीतर्फे मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:48 AM2021-09-23T04:48:19+5:302021-09-23T04:48:19+5:30
पुसद : येथील माणुसकीच्या भिंतीतर्फे अर्धांगवायूग्रस्त काजलला मदतीचा हात देण्यात आला. या मदतीने तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले. आपल्याला ...
पुसद : येथील माणुसकीच्या भिंतीतर्फे अर्धांगवायूग्रस्त काजलला मदतीचा हात देण्यात आला. या मदतीने तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले. आपल्याला समाजाचे काही देणे लागते, या उदात्त हेतूने माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन गोरगरीब, गरजू, अनाथांना मदत करीत आहे. काजल झळके (२०) चिरकुटा, ता.दिग्रस हिची अर्धांगवायूने उजवी बाजू कमकुवत झाली आहे. उजवा पाय, उजवा हात, उजवीकडचा चेहरा व बोलण्यात अडचण येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे तिला दवाखान्यात इलाज करता आला नाही. ती घरगुती औषध घेऊनच दिवस काढत होती. येथील डॉक्टरांनी फिजियोथेरिपी उपचारासाठी ३६ हजार रुपये खर्च सांगितला होता.
काजलचे पालक रोजमजुरी करतात. तिची देखभाल आजी वत्सलाबाई झळके करतात. माणुसकीची भिंत सदस्यांनी डॉ.नवथळे यांची भेट घेतली. डॉक्टरांनी नऊ हजार रुपये कमी करून उर्वरित २७ हजारांची व्यवस्था सदस्यांना करण्यास सांगितले. तिला नवीन जीवन मिळवून देण्याकरिता जमेल ती मदत करण्याचे आवाहन माणुसकीची भिंतच्या सदस्यांनी केले. सदस्यांनी मदत म्हणून २८ हजार ६५० रुपये मदत दिली. सर्व दान दात्यांचे माणुसकीच्या भिंतीने आभार मानले.