ग्रामीण मुलींना अमेरिकेतून मदत
By admin | Published: March 19, 2017 01:30 AM2017-03-19T01:30:04+5:302017-03-19T01:30:04+5:30
जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या हरसूल येथील विद्यार्थिनींना थेट अमेरिकेतून मदत मिळाली आहे.
गावाशी नाळ कायम : सॅनफ्रान्सिस्कोच्या अभियंत्यांचे दातृत्व
हरसूल : जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या हरसूल येथील विद्यार्थिनींना थेट अमेरिकेतून मदत मिळाली आहे. येथील ग्रामीण मुलींचा शाळेपर्यंत पोहोचण्याचा संघर्ष कळताच मंजुषा संजय कोषटवार यांनी सायकलच्या रूपात मदत दिली.
येथील वामनराव राऊत विद्यालय व नागसेन महाविद्यालयात गांधीनगर, गादेगाव, मोरखेड, आनंदवाडी, लायगव्हाण, मांडवा, धानोरा या गावातून मुली शिक्षणासाठी येतात. काही मुली सायकलने तर काही पायीच येतात.
अमेरिकेच्या सॅनफ्रान्सीस्को भागात संगणक अभियंता असणाऱ्या मंजुषा कोषटवार हरसूलच्या मूळ रहिवासी आहे. येथील बालपणींच्या आठवणीचा संग्रह त्यांच्या मनात कायम आहे. त्यांचे वडील पद्माकर लाभशेटवार, आई अनिता लाभशेटवार यांच्या उपस्थितीत येथील गजानन महाराज मंदिरात सायकल वाटपाचा कार्यक्रम झाला. गिरी महाराज आळंदीकर, सरपंच आशा भगत, उपसरपंच पंकज देशमुख, सुशीला बोरा, ग्रामविकास अधिकारी क्षीरसागर, ज्योती उपलेंचवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. गरजू महिलांना पातळ, ब्लँकेट, चादर, सतरंजी, शाल वितरीत करण्यात आल्या. मंजुषा कोषटवार यांनी बळीराजा चेतना अभियानांतर्गत तीन विधवा महिलांना गाई भेट दिल्या. येथील संस्कार कलश योजना, ज्ञानोदय वसतिगृह दिग्रस, आनंद निकेतन, अच्युत महाराज यांच्या अमरावती येथील दवाखान्याला भरीव मदत केली आहे. सायकल वाटप कार्यक्रमासाठी आनंद गायकवाड, दिगंबर वऱ्हाडे यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)