इथे रांगेत भरतात अधिकाऱ्यांचे खिसे; खासगी पंटरचा चेक पोस्टवर ताबा, वाहनधारकांची बेसुमार लूट

By विशाल सोनटक्के | Published: September 30, 2023 11:53 AM2023-09-30T11:53:24+5:302023-09-30T11:57:23+5:30

'लोकमत'ने केलेल्या पाहणीत हे वास्तव समोर आले

Here the queue fills the pockets of the officials; Lots of loot from motorists | इथे रांगेत भरतात अधिकाऱ्यांचे खिसे; खासगी पंटरचा चेक पोस्टवर ताबा, वाहनधारकांची बेसुमार लूट

इथे रांगेत भरतात अधिकाऱ्यांचे खिसे; खासगी पंटरचा चेक पोस्टवर ताबा, वाहनधारकांची बेसुमार लूट

googlenewsNext

विशाल सोनटक्के

यवतमाळ : राज्यातील बॉर्डर चेक पोस्टचे आधुनिकीकरण आणि संगणकीकरण झाल्याने येथे वाहनांना फार वेळ थांबण्याची गरज नाही, असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात या नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. रांगेत येऊन या वाहनचालकांना नाक्यावरील एका झोपडीत शे-दोनशे रुपयांचा प्रसाद परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना वाहावाच लागतो. अन्यथा तेथे नेमलेल्या खासगी पंटरकडून प्रसंगी मारहाणही केली जाते. हे चित्र आहे, वाहनधारकांची बेसुमार लूट होणाऱ्या पिंपळखुटीतील सीमा तपासणी नाक्यावरील. गुरुवारी २८ सप्टेंबर रोजी 'लोकमत'ने केलेल्या पाहणीत हे वास्तव समोर आले आहे.

राज्याच्या सीमेलगत परिवहन विभागाच्या वतीने १२ सीमा तपासणी नाके (बॉर्डर चेक पोस्ट) उभारण्यात आले आहे. परप्रांतातून येणाऱ्या, तसेच परप्रांतात जाणाऱ्या वाहनांची तपासणी व कर वसुली करण्याची कामे या तपासणी नाक्यावर अपेक्षित असली तरी सध्या हे सर्व तपासणी नाके केवळ अधिकाऱ्यांचे खिसे भरणारे चेक पोस्ट झाल्याचे चित्र आहे. विधान परिषदेत प्रश्न उपस्थित न करण्यासाठी आरटीओकडून २५ लाखांंची मागणी केल्याप्रकरणी एसीबीने एका आमदाराची चौकशी केल्याचे प्रकरण नुकतेच गाजले होते. ज्या बॉर्डर चेक पोस्टवरून हे प्रकरण घडले त्या महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील पिंपळखुटी येथे खासगी लोकांना हाताशी धरून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वाहनधारकांची आजही उघडपणे लूट केली जात आहे.

तपासणी नाक्यावर खासगी व्यक्ती आढळल्यास त्याच्याविरुद्ध स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे आदेश गृहविभागाने दिले होते. मात्र, हे आदेश येथे सर्रास धाब्यावर बसविले जातात. वाहन चालकांची कागदपत्रे अधिकार नसताना खासगी व्यक्तीकडून हाताळली जातात अशा तक्रारी आहेत. यासाठी या चेक पोस्टवर दोन स्वतंत्र टीम तैनात असल्याचे बोलले जात आहे. सुमारे १० ते १२ तरुणांची टीम चेक पोस्टवर वाहन चालकांकडून पैसे स्वीकारण्यासह हिशेब तपासणी, तसेच लिखापढी करण्याचे काम करते. ‘एडीसी’ असे या टीमला म्हटले जाते. यातील तरुणांना दर दिवशी हजार ते दीड हजार रुपये दिले जातात, तर दुसरी टीम दंडेवाल्याची म्हणून ओळखली जाते. या टीममध्ये ४० ते ५० तरुण असून, ट्रक चालकांच्या रांगा लावणे, त्यांना नाक्यावरील झोपडीत पैसे घेऊन पाठविण्याचे काम हे तरुण करतात.

या तरुणांना दररोज ५०० रुपये दिले जातात. आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करणारे हे तरुण नाका परिसरात वाहनधारकांकडूनही परस्पर हजार-पाचशे रुपये उकळतात ते वेगळेच. नाक्यावरील झोपडीत प्रत्येक वाहनाला पैसे द्यावेच लागतात. महाराष्ट्रातील वाहनाला १०० ते २०० रुपये, तर परराज्यातील प्रत्येक वाहनाला २०० पेक्षा अधिकची रक्कम येथे सोडावी लागते हे विशेष.

ओव्हरलोडिंग वाहनांकडून पैसे उकळण्यासाठी नवी शक्कल

  • नाक्याचे संगणकीकरण केल्याने ओव्हरलोडिंग वाहने कमी झाल्याचा दावा परिवहन विभागाकडून केला जातो, तसेच जी वाहने ओव्हर लोड आढळतात, त्यांना दंड होतो, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ओव्हरलोडिंग वाहनांसाठी या नाक्यावर स्वतंत्र यंत्रणा उभारल्याचे चित्र आहे.
  • ओव्हरलोड वाहन एकदा सिस्टममध्ये सापडल्यानंतर या वाहनाला भारी भक्कम दंड फाडावाच लागतो. मात्र, अशी वाहने थेट नाक्यावर येणारच नाहीत, याची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले जाते.
  • नाक्यापासून काही अंतरावर ओव्हरलोडिंग वाहनातील माल दुसऱ्या वाहनात उतरविला जातो. हेच दुसरे वाहन हा नाका ओलांडल्यानंतर पुन्हा मूळ वाहनात माल भरते. यासाठी नियुक्त केलेल्या या वाहनाला किलोमागे पैसे मोजावे लागतात. दुसरीकडे वाहन अधिकाऱ्यांचाही खिसा गरम करावा लागतो. या माध्यमातूनही दररोज लाखोंची वसुली केली जाते.

Web Title: Here the queue fills the pockets of the officials; Lots of loot from motorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.