महामार्गाला गेले तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 10:07 PM2018-11-18T22:07:07+5:302018-11-18T22:08:30+5:30
नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गाला आर्णीनजिक आत्ताच तडे गेले. वाहतुकीपूर्वीच रस्त्याला तडे गेल्याने बांधकाम कंपनीची विश्वासार्हताच धोक्यात सापडली आहे.
राजेश कुशवाह ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गाला आर्णीनजिक आत्ताच तडे गेले. वाहतुकीपूर्वीच रस्त्याला तडे गेल्याने बांधकाम कंपनीची विश्वासार्हताच धोक्यात सापडली आहे.
नागपूर-बोरी-तुळजापूर महागामार्गाचे चौपदरीकरणाने काम जोरात सुरू आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी या रस्त्याचे लोकार्पण व्हावे म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. लोकापर्ण होताच अधिकृतपणे या रस्त्यावरून वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळेच देशातील पहिल्या क्रमांकावर असलेल्या रस्ता बांधकाम कंपनीला कोट्यवधींचे कंत्राट देण्यात आले आहे. कंपनीने युद्ध पातळीवर बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालविले आहे.
कंपनीचे काम जोरात सुरू आहे. त्यासाठी रात्रंदिन मजूर राबत आहे. आर्णी तालुक्यातील तरोडा ते कोसदणीपर्यंतच्या ४० किलोमीटरचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आहे. दिवसरात्र चालणाऱ्या या कामावर हजारो मजुरांसह अद्ययावत यंत्रसामुग्री आहे. मात्र काही ठिकाणी या महागार्माला तडे गेल्याचे दिसत आहे. तालुक्यात सुकळी तसेच लोणबेहळ ते कोसदणी भागातील जंगलातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अद्याप या रस्त्यावर पाहिजे तशी वाहतूक सुरू झाली नाही. तरीही रस्त्याला तडे गेले आहे. त्यामुळे बांधकाम कंपनीच्या कामावरच शंका उपस्थित केली जात आहे.
रस्त्याचे आयुष्य १00 वर्षे
या महामार्गाचे आयुष्य १00 वर्षांचे असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात वाहतूक सुरू होण्यापूर्वीच रस्त्याला तडे जात आहे. त्यामुळे पुढील १00 वर्षे हा रस्ता टिकेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे रस्ता बांधकाम कंपनीच्या विश्वासार्हतेला तडा बसण्याची शक्यता आहे.