‘वायपीएस’मध्ये हिंदी दिवस महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 09:38 PM2017-10-03T21:38:51+5:302017-10-03T21:39:55+5:30
हिंदी दिवसाचे औचित्य साधून यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये हिंदी दिवस महोत्सव घेण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हिंदी दिवसाचे औचित्य साधून यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये हिंदी दिवस महोत्सव घेण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे प्रा.डॉ. अनवर अहमद सिद्दिकी तसेच डॉ. अरुण असोलकर लाभले होते.
माँ सरस्वती प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. संगीत शिक्षक विशाल शेंदरकर व सचिन वालगुंजे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी समूहाने स्वागतगीत सादर केले. प्राचार्य जेकब दास यांनी फुलांचे रोपटे देऊन डॉ. अनवर यांचे स्वागत केले. ‘वायपीएस’चे हिंदी विभाग प्रमुख दिनेश जयस्वाल यांनी डॉ. सिद्दिकी यांच्या कार्याची माहिती दिली.
विविध उपक्रमांतर्गत सातवीची विद्यार्थिनी अमोलिका वावरे हिने हिंदीचे महत्त्व सांगितले. विशालाक्षी राखाडे, सृष्टी ढाले, धनश्री गुल्हाने, पद्मासिनी रथ, श्रेया बाजोरिया यांनी हास्य कविता सादर केल्या. हिंदी विषयाच्या शिक्षिका नीलम शर्मा यांनी प्रेरणात्मक कवितांचे सादरीकरण केले. किशोरी मिलके यांनी पीपीटीच्या माध्यमातून हिंदीचे महत्त्व सांगितले. उपन्यासकार सम्राट प्रेमचंदजी यांचे जीवन आणि रचनांचा परिचय मानसी बाजोरिया व प्रगती नागवानी यांनी करून दिला. विद्यार्थिनी सई पंचभाई हिने कीर्तनातून हिंदीचे महत्त्व सांगितले.
डॉ. अनवर सिद्दिकी यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पर्धा करणे चांगले आहे. पण, इर्ष्या योग्य नाही असे सांगितले. सोबतच त्यांनी विविध कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे संचालन मंजू शाहू, स्मिता मिश्रा यांनी, तर आभार दिनेश जयस्वाल यांनी मानले. महोत्सवासाठी नीलम शर्मा, योगीता कडू आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले.