निष्ठावंत शिवसैनिकांचा हिंदुत्वाचा हुंकार
By admin | Published: January 24, 2016 02:16 AM2016-01-24T02:16:59+5:302016-01-24T02:16:59+5:30
धसमुसळेपणा, पराकोटीची आक्रमकता आणि सार्वजनिक जीवनात बेशिस्त अशी पालुपदं शिवसैनिकांच्या माथ्यावर नेहमीच चिटकविली जातात.
यवतमाळात हिंदुत्व रॅली : बाळासाहेबांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दाखविली शिस्त, हजारो शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग
अविनाश साबापुरे यवतमाळ
धसमुसळेपणा, पराकोटीची आक्रमकता आणि सार्वजनिक जीवनात बेशिस्त अशी पालुपदं शिवसैनिकांच्या माथ्यावर नेहमीच चिटकविली जातात. पण हा अपसमज शनिवारी यवतमाळच्या सच्च्या शिवैनिकांनी पुसून काढला. शहरातून निघालेल्या हिंदुत्व रॅलीत सामील झालेल्या हजारो कार्यकर्त्यांचे प्रत्येक पाऊल शिस्तीत पडले अन् बाळासाहेबांच्या जयघोषासोबतच हिंदुत्वाचा जाज्वल्य हुंकारही एकासुरातच निनादला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी यवतमाळात हिंदू रॅली काढण्याचा आगळा पायंडा पालकमंत्री संजय राठोड यांनी निर्माण केला आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी हेलीपॅड मैदानावर दहा हजारांहून अधिक शिवसैनिक गोळा झाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ‘सैनिक’ का म्हणतात, याचे उत्तर या कार्यकर्त्यांच्या वर्तनातून यवतमाळकरांना मिळाले. हजारो शिवसैनिक कोणताही गोंधळ न करता एका रांगेत बसले. तब्बल दोन तास ते एका जागी शिस्तबद्धपणे बसले होते.
यवतमाळात हिंदुत्वाचा उच्चार करीत यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही कार्यक्रम झाले. त्या स्वयंसेवकांची गर्दी आणि शिस्त खूप चर्चिली गेली. पण शनिवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावान मावळ्यांनी दाखविलेली शिस्त केवळ पक्षशिस्त नव्हती, तर कुटुंबप्रमुखाच्या आदरयुक्त दराऱ्यातून निर्माण झालेली ती कौटुंबिक शिस्त होती. ‘संघ’टनेची अप्रतिष्ठा होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक घेतलेली ती ‘दक्ष’ता नव्हती. तर गावखेड्यातून मुलाबाळांसह आलेल्या सामान्य शिवसैनिकाला भगव्याविषयी वाटणारी ती आपुलकी होती. हजारो शिवसैनिक आपापल्या तालुक्यांच्या रांगांमध्ये बसले. रांगांच्या अग्रस्थानी बसलेल्या तालुका प्रमुखांच्या हाती भगवा झेंडा तळपणाऱ्या उन्हात फडफडत होता. आपली रांग काटेकोर असलीच पाहिजे, हा या रांगांच्या नेत्यांचा अट्टहास होता. कोणताही झेंडा पाहावा, तो सरळ करारीपणे उभा दिसला. बाळासाहेबांचा आदेश म्हणून वरिष्ठांनी दिलेला भगवा शेला हजारोंच्या गर्दीतला प्रत्येक जण शौर्यपदक मिळाल्यागत मिरवत होता. खांद्यावर भगवा शेला घेतलेली ही गर्दी म्हणजे सैन्याची तुकडीच बनली होती. या सैन्याला जिल्हा प्रमुख संतोष ढवळे ध्वनीक्षेपकातून काही विनंत्या करीत होते. रांगा मोडू नका, कोणीही उभे राहू नका, पाण्याचे पाऊच निळ्या बॅगमध्येच टाका... या प्रत्येक वाक्याच्या आरंभी ते आवर्जून ‘कृपया’ म्हणत होते, पण ही विनंतीही खास शिवसेनास्टाईल कडक स्वरातच होती. त्यामुळेच हजारो शिवसैनिक मैदानातून गेल्यावरही केरकचऱ्याचा कुठेच मागमूसही नव्हता.
कार्यक्रम सुरू असताना कलेक्टर आॅफीसपासून तर बसस्थानकापर्यंत शिवसैनिकांच्या वाहनांची रांग लागलेली होती. पण एकही वाहन वाहतुकीला अडथळा होईल, असे अस्ताव्यस्त उभे नव्हते. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना त्रास होणार नाही, याची काळजी खुद्द शिवसैनिकांनीच घेऊन शिस्तीचा स्वयंभू पुरावा दिला. शिवसैनिकांच्या वाहनांवरही आपल्या संघटनेविषयीचा स्वाभिमान झळकत होता. क्रूझर, ट्रॅक्स, तीनचाकी आॅटोरिक्षा अशा वाहनांतून हे शिवसैनिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हिंदुत्व रॅलीसाठी आले. या वाहनांवर ‘राजे’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘आवाज कुणाचा’, ‘मातोश्री’ अशा घोषवाक्यांसोबतच शिवसेनेच्या डरकाळी फोडणाऱ्या ‘वाघा’चे चित्र होते. शिवसैनिक केवळ कार्यक्रमापुरता निष्ठा दाखवित नाही, तर त्याच्या रोजच्या जगण्यातच तो संघटनेची निष्ठा व्यवस्थित सांभाळतो, याचेच हे जिवंत उदाहरण.
या कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर, जिल्हा प्रमुख संतोष ढवळे, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, शहरप्रमुख पराग पिंगळे, युवासेनेचे जिल्हा प्रमुख गजानन बेजंकीवार, उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, शैलेश ठाकूर, महिला आघाडी संघटक लता चंदेल आदी मान्यवर उपस्थित होते. नेहरू स्टेडीयमवर या रॅलीचा समारोप झाला. तेथे शिवसैनिकांना पालकमंत्र्यांच्या ‘वर्षपूर्ती’ पुस्तिकेचे वाटप केले. येथेच तब्बल १४ हजार शिवसैनिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. बाळासाहेबांना दैवत मानणाऱ्या सच्च्या शिवसैनिकांच्या गर्दीने यवतमाळ हरखून गेले होते.
सेनेची एकहाती सत्ता आणूच - संजय राठोड
आपण अठरापगड जातीचे लोक शिवसेनेच्या छत्राखाली एकत्र आलो, ही बाळासाहेबांच्या ‘हिंदुत्वा’चीच देण होय. आज सत्तेत असूनही कामे होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेची एकहाती सत्ता आणूच, असा विश्वास पालकमंत्री संजय राठोड यांनी शिवसैनिकांना दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हिंदुत्व रॅलीला ते संबोधित करीत होते.