प्राध्यापिकेला पेटवल्याप्रकरणी हिंगणघाटात कडकडीत बंद; अवघे शहरच उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 03:27 PM2020-02-04T15:27:06+5:302020-02-04T15:27:45+5:30
एकतर्फी प्रेमातून एका तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याच्या धक्कादायक घटनेनंतर हिंगणघाट शहरात जनआक्रोश गगनाला भिडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: एकतर्फी प्रेमातून एका तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याच्या धक्कादायक घटनेनंतर हिंगणघाट शहरात जनआक्रोश गगनाला भिडला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी अवघे हिंगणघाट शहरच निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसले.
गुन्हेगाराला ताबडतोब फाशीची शिक्षा द्या, अशा मागणीचे फलक घेऊन विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, पुरुष, कामगार, डॉक्टर्स, वकील, व्यापारी वर्ग व अन्य संघटनांनी मोर्चा काढला. जेथे ही घटना घडली त्या नंदोरी चौकातून निघून हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे गेला. या मोर्चाला गावातल्या लहान लहान भागातून निघालेले छोटे मोर्चे सामील होताना दिसत होते. येथे मोर्चेकऱ्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
आरोपीला जाळून टाका, न्याय द्या, सुरक्षा हवी अशा आशयाचे फलक व घोषणा यावेळी दिल्या जात होत्या. समुद्रपूरमध्येही अशाच प्रकारचा मोठा मोर्चा काढण्यात आला.