अपत्यासाठी पत्नीला केले मित्राच्या स्वाधीन
By Admin | Published: November 1, 2014 01:11 AM2014-11-01T01:11:40+5:302014-11-01T01:11:40+5:30
लग्नाला पाच वर्ष होऊनही अपत्यप्राप्ती होत नसल्याने एका पतीने माणुसकीला काळीमा फासण्याचा निंदनीय कृत्य केले.
यवतमाळ : लग्नाला पाच वर्ष होऊनही अपत्यप्राप्ती होत नसल्याने एका पतीने माणुसकीला काळीमा फासण्याचा निंदनीय कृत्य केले. अपत्यप्राप्तीच्या नादात त्याने चक्क आपल्या पत्नीलाच मित्राच्या स्वाधीन केले. ही समाजमन सुन्न करणारी घटना यवतमाळ तालुक्यातील जांब येथे घडली. पीडित पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्राला अटक केली.
रामप्रसाद रा. जांब असे पतीचे तर विजय कोडापे रा. जांब असे त्याच्या मित्राचे नाव आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एका तरूणीशी रामप्रसादचा पाच वर्षापूर्वी रीतिरिवाजाने विवाह झाला. मात्र त्याला अपत्यप्राप्ती झाली नाही. अपत्य होत नसल्याने त्याने पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने चक्क मित्र विजय कोडापे याच्या घरी नेऊन तिला अपत्यासाठी त्याच्या स्वाधीन केले. या घृणास्पद कृत्यासाठी तिची सहमती नसताना संबंधित दोघांनीही संगनमताने बळजबरी केली. घटनेनंतर पीडित विवाहितेने थेट माहेर गाठले. तसेच नातेवाईकांकडे आपबीती कथन केली. त्यावरून नातेवाईकांनी पीडित मुलीसह देवळी पोलीस ठाणे गाठले तसेच याप्रकरणी तक्रार दिली.
त्यावरून देवळी पोलिसांनी पती रामप्रसाद आणि त्याचा मित्र विजय कोडापे याच्याविरूद्घ झिरोवर भादंवि ३७६ (ग) कलमान्वये बलात्काराचा गुन्हा नोंदविला. तसेच घटना जांब येथील असल्याने हा गुन्हा हद्द असलेल्या यवतमाळ ग्रामीण पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केला. त्यावरून पोलिसांनी या गुन्ह्याची कायमी करून संबंधित दोघांनाही गुरूवारी दुपारी राहत्या घरून अटक केली. या घटनेने जांबसह लगतच्या परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)