दिग्रस येथे ‘कालनिर्णय’ची होळी; महापुरूषांच्या जयंतीचा उल्लेख टाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 05:49 PM2018-12-20T17:49:35+5:302018-12-20T17:50:20+5:30
बंजारा समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज आणि हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा उल्लेख टाळल्याने बंजारा समाज बांधवांनी गुरुवारी कालनिर्णय दिनदर्शिकेची होळी केली.
दिग्रस (यवतमाळ) : बंजारा समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज आणि हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा उल्लेख टाळल्याने बंजारा समाज बांधवांनी गुरुवारी कालनिर्णय दिनदर्शिकेची होळी केली. यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे धर्मगुरू आहे. दिवंगत वसंतराव नाईक समाजाचे महानायक आहेत. त्यांनी राज्यात हरित क्रांती घडवून आणली. या दोन्ही महापुरुषांची जयंती शासनस्तरावर साजरी केली जाते. मात्र कालनिर्णय दिनदर्शिकेत या महापुरुषांच्या जयंती दिनाचा उल्लेख टाळण्यात आला. यामुळे बंजारा समाज बांधवांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. सर्वत्र संतप्त भावना प्रगट होत आहे. येथील शिवाजी चौकात बंजारा क्रांती दलातर्फे गुरुवारी कालनिर्णय दिनदर्शिका जाळून याचा निषेध नोंदविण्यात आला.
संपूर्ण देशात १३ कोटी, तर महाराष्ट्रात एक कोटी बंजारा समाज बांधव वास्तव्याला आहे. संत सेवालाल महाराज यांची जयंती राज्यात सर्वत्र साजरी केली जाते. दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंती राज्यात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. मागील वर्षीपासून १९ फेब्रुवारीला संत सेवालाल महाराज यांची जयंती शासनस्तरावर साजरी करण्याचा निर्णय झाला. मात्र कालनिर्णय दिनदर्शिकेत या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीचा उल्लेख टाळून बंजारा समाज बांधवांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार केल्याचा आरोप बंजारा समाज बांधवांनी केला. ही दिनदर्शिका जप्त करून नव्याने प्रकाशित करावी, अशी मागणी बंजारा क्रांती दलाने केली आहे.
पंचायत समिती सभापती विनोद जाधव, सोसायटी अध्यक्ष बाबूसिंग जाधव, बंजारा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, तालुकाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण यांच्या नेतृत्वात कालनिर्णय दिनदर्शिकेची होळी करण्यात आली. याप्रसंगी अमोल पवार, धीरज राठोड, कैलास चव्हाण, हंसराज राठोड, अशोक राठोड, ललित राठोड, सुनील जाधव, प्रदीप राठोड, अविनाश राठोड, इंदल पवार, अमोल पवार, किसन पवार, मनोहर राठोड, रमेश पवार आदी पदाधिकाºयांसह बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.