होळीला तांड्या-तांड्यात अवतरते गोकूळ
By admin | Published: March 6, 2015 02:13 AM2015-03-06T02:13:18+5:302015-03-06T02:13:18+5:30
होळी आणि धूळवड या सणांना प्रत्येक समाजात वेगवेगळ्या परंपरा आहेत. या परंपरांना आधुनिक ‘टच’ मिळवून आनंदाचे सण काहीसे विकृत होऊ लागले आहेत.
सुनील हिरास दिग्रस
होळी आणि धूळवड या सणांना प्रत्येक समाजात वेगवेगळ्या परंपरा आहेत. या परंपरांना आधुनिक ‘टच’ मिळवून आनंदाचे सण काहीसे विकृत होऊ लागले आहेत. मात्र काही समाजांनी अजूनही सणांची पुरातन परंपरा जपली आहे. बंजारा समाजाने जपलेली होळीची परंपरा त्याचेच एक उदाहरण होय. होळीनंतर ‘लेंगी’ महोत्सव एक सांस्कृतिक पर्वणीच असते. होळीच्या आनंदाची पर्वणी जिल्ह्यातील प्रत्येक तांड्यात व गावातही पाहायला मिळते.
मानवी नात्यांची वीण घट्ट करणाऱ्या प्रेम अन् आनंदाची उधळण बंजारा समाज होळीच्या निमित्ताने करीत असतो. म्हणूनच या सणाचे धार्मिक व सामाजिक महत्त्व व अस्सल पण अजूनही टिकून राहिले आहे. बंजाराबहुल असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याची ही आगळीवेगळी सांस्कृतिक ओळखच म्हणावी लागेल. प्रत्येक गावच्या तांड्यावर होळीचा आनंद अन् उत्साह भरभरून वाहत आहे. होळी हा लोक संस्कृतीचा उत्सव म्हणूनच हा समाज साजरा करीत असतो. तांडा किंवा गाव म्हणजे रंगभूमीच असते आणि या रंगभूमीवर लोककलेचा सुंदर अविष्कार होळीच्या निमित्ताने पाहायला मिळतो. होळीच्या निमित्ताने तांड्यातांड्यात डफडीचा आवाज घुमू लागतो. या डफडीच्या तालावर तांड्यातला प्रत्येक लहान मोठा फेर धरती अन् सुरू होते होळीच्या गाण्यांची समृद्ध परंपरा.
होळीची गाणी हे या सणाचे प्रमुख वैशिष्ट्य. बाया-माणसे सारेच ही गाणी मोठ्या आनंदाने सुरेल व एका आवाजात गातात. विशेषत: महिला अशी गाणी गाताना गाण्यांशी एकरूप होवून तन्मयतेने नाचू लागतात. होळीच्या या लोक संस्कृतीच्या प्रवाहात रितीरिवाज तर आहेतच शिवाय त्यात सण, उत्सव, व्रत, खेळ, मनोरंजन, विनोद यांचा अविट मेळ घातला आहे.
रातेन काई वात किती ऐ गोरी
हाटेन जाऊ तारे वास्तू गोरी ऐ
कत गोतो मारो लाढो देवरिया
माहूरेन गोतो मारी सीता भोजाई
या समाजातील गाणी मानव जीवनाच्या जन्मापासून थेट मृत्यूपर्यंत रचली आहेत. ही गीते केवळ गाणी आणि मनोरंजनापुरती मर्यादित नसून त्यात जीवनाचा गहन अर्थही दडला आहे. ‘लेंगी’ महोत्सव हे याचे अधिक चांगले उदाहरण होईल.
अमर वेगेर एक चांदा रे सूर्या
नव लाख तारा ओरे साथ चले
सोबतेम चले धरती तो पर
तांड्यातील प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येकाने होळीचा आनंद घ्यावा याची काळजी तांड्यावरचे नायक, कारभारी घेत असतात. होळीच्या उत्सव पाच दिवसांचा असला तरी त्यातील पाल, फाग आणि गेद महत्त्वाचे मानले जातात. बंजारा महिला-पुरुष आपल्या पारंपरिक वेशभूषेत लेंगी गीत म्हणतात. गोलाकार वर्तुळाकार नाचत हा उत्सव बेभान होवून आनंदाला वाट करून देतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी फाग मागण्याची परंपरा आहे.