घरवापसीने काँग्रेसला संजीवनी

By admin | Published: October 16, 2015 02:41 AM2015-10-16T02:41:00+5:302015-10-16T02:41:00+5:30

अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांत काँग्रेसची चांगलीच वाताहात झाली आहे.

Home Minister gave Sanjivani to Congress | घरवापसीने काँग्रेसला संजीवनी

घरवापसीने काँग्रेसला संजीवनी

Next

बुडत्याला मिळाला आधार : अग्रवाल यांनी भरला कार्यकर्त्यांमध्ये जोश
बोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांत काँग्रेसची चांगलीच वाताहात झाली आहे. मात्र नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने खा. नाना पटोले यांचे खास शिलेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केल्याने तसेच भाजपातील काही युवकांनी प्रवेश केल्याने सध्या तरी काँग्रेसला नवसंजीवनी मिळालेली दिसत आहे.
मागील काही वर्षापासून सक्षम नेतृत्वाअभावी अर्जुनी मोररगाव तालुक्यात काँग्रेसची पिछेहाट झालेली दिसत आहे. अलिकडेच झालेल्या जि.प., पं.स. तसेच सहकार क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पाहिजे त्या प्रमाणात यश मिळाले नाही. तालुक्याची धुरा सांभाळणारे पदाधिकारी पक्ष संघटनेच्या कामासाठी पूर्णवेळ देत नाहीत, अशी सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांची ओरड आहे. एकंदरित तालुक्यात काँग्रेसची वाताहत होत असताना गोंदियाचे काँग्रेसचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्याचे काम केले.
काही वर्षापूर्वी अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेसमय होता. खा.पटोले काँग्रेसमध्ये होते तेव्हा तालुक्यात सर्वत्र काँग्रेसचा जनाधार कमालीचा वाढलेला दिसत होता. तालुक्यातील सार्वजनिक तसेच सहकार क्षेत्रावरही काँग्रेसची पकड होती. पटोले भाजपात गेले तेव्हा भाजपला त्यांच्याकडून आशा निर्माण झाली.
पटोलेसोबत शेकडो काँग्रेसी कार्यकर्त्यांनी त्यांचे एकनिष्ठ शिलेदार बनून भाजपाची कास धरली होती. मात्र काही वर्षे लोटल्यानंतरही पटोलेंच्या शिलेदारांना भाजपाने स्वीकारलेच नाही, याची खात्री त्या कार्यकर्त्यांना होताच त्यांनी आपले जुनेच काँग्रेसी घर बरे, असे समजले. सर्वप्रथम माजी जि.प.सदस्य किरण कांबळे यांनी घरवापसी केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे यांनी खा. पटोलेंची साथ सोडून काँग्रेसची वाट धरली. अलीकडेच अर्जुनी मोरगाव येथे झालेल्या एका काँग्रेसच्या कार्यक्रमात खा. नाना पटोलेचे खास शिलेदार समजले जाणारे नवीन नशिने, सुुनील लंजे यासारख्या कार्यकर्त्यांनी घरवापसी केली.
नाना समर्थकांच्या या काँग्रेस प्रवेशाने तालुक्यात काही प्रमाणात तरी काँग्रेसला बळकटी येईल. पूर्वाश्रमीचे भाजप विचारसरणीशी समरस होणारे, पाटील लॉबीचे समजले जाणारे युवा उद्योगपती किशोर शहारे, प्रवीण शहारे, पिंटू हातझाडे, तुकाराम लोगडे, जितेंद्र हातझाडे, बाळू मस्के, दिलीप यावलकर, पारेश्वर डोंबरे, संतोष यावलकर यासह १८० युवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आज तरी अर्जुनी मोरगाव येथे काँग्रेसमध्ये जीव आल्याचे दिसून येत आहे.
अर्जुनी मोरगाव येथील काँग्रेसची धुरा जिल्हा परिषद सदस्य गिरीष पालीवाल, अजय पशिने, बाजार समितीचे संचालक सर्वेश भुतडा, सोमेश्वर सौंदरकर, किशोर शहारे, नवीन नशिने, कृष्णा शहारे यांच्यावर येवून पडल्याने या युवा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा जोश दिसत आहे.
तालुक्यात काही उरलेल्या खा.पटोले यांच्या शिलेदारांची पक्षात गच्छंती होत असल्याने त्यांनाही घरवापसीचा पर्याय खुला असल्याचे चित्र काँग्रेसने निर्माण केले आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तालुका काँग्रेस अध्यक्षपदी पक्ष संघटनेसाठी वेळ देणाऱ्या सक्षम नेतृत्वाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावल्यास काँग्रेसला पुर्वाश्रमीचे वैभव गाठण्यास वेळ लागणार नाही, असे राजकीय गोटात बोलल्या जात आहे. एकंदरित आ.अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने तसेच खा. नाना पटोलेंच्या समर्थकांच्या घरवापसीने काँग्रेसमध्ये नवचैतन्य पसरलेले दिसत आहे. (वार्ताहर)

Web Title: Home Minister gave Sanjivani to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.