पुसद तालुक्यात १३ हजार नागरिकांची घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:00:27+5:30
तालुक्यात परजिल्हा व परप्रांतातून परतणाऱ्या सर्व नागरिकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करुन त्यांच्या हातावर शिक्के मारुन त्यांना होम क्वारंटाईन शिक्के मारले गेले. सध्या सहा हजार १०१ नागरिक होम क्वारंटाईन असून तब्बल सहा हजार ८४५ जणांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना क्वारंटाईन मुक्त करण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी, मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे आदी उपाययोजना केल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : कोरोनाने थैमान घातल्यामुळे राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन आहे. यामुळे परजिल्हा व परप्रांतात तालुक्यातील नागरिक, कामगार, मजूर, विद्यार्थी, प्रवासी अडकून पडले होते. लॉकडाऊन-४ मध्ये त्यांना शासनाने आपापल्या गावी परतण्याची मुभा दिली. शासनाच्या परवानगीने २५ मे पर्यंत तालुक्यात १२ हजार ९४६ नागरिकांनी घरवापसी केली आहे. यात सहा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना यवतमाळच्या शासकीय महाविद्यालयाच्या कोरोना कक्षात दाखल केले आहे.
तालुक्यात परजिल्हा व परप्रांतातून परतणाऱ्या सर्व नागरिकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करुन त्यांच्या हातावर शिक्के मारुन त्यांना होम क्वारंटाईन शिक्के मारले गेले. सध्या सहा हजार १०१ नागरिक होम क्वारंटाईन असून तब्बल सहा हजार ८४५ जणांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना क्वारंटाईन मुक्त करण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी, मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे आदी उपाययोजना केल्या जात आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व कामकाज पूर्णत: बंद झाल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी महानगरात गेलेल्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. अनेकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांनी ‘गड्या आपुला गाव बरा’ म्हणत मिळेल त्या वाहनाने आपले गाव जवळ केले. अनेक जण पायदळ प्रवास करीत गावाकडे परतले.
परजिल्हा व परप्रांतात अडकलेले कामगार, मजूर, नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी आदींनी गावी परतण्याची मुभा मिळाल्यावर आॅनलाईन परवानगी मिळविली व आपले गाव गाठले. तालुक्याच्या १९६ गावांमध्ये २५ मे पर्यंत १२ हजार ९४६ नागरिक परत आले. त्यांची शेंबाळपिंप्री, फेट्रा, बेलोरा, जांब बाजार, चोंढी, गौळ बु. आदी सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एकूण ४७ उपकेंद्रांवर आरोग्य तपासणी करण्यात आली. शहरातील आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणातही तपासणी सकाळी ८ ते १२.३० व दुपारी ४ ते ६ या कालावधीत केली जात आहे. तालुक्यातील आठ जण आत्तापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून यामध्ये हुडी येथील चार तर निंबी येथील चार जणांचा समावेश आहे. प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील २२ जण सध्या क्वारंटाईन केले. यामध्ये हुडी बु. येथील पाच, निंबी येथील १२ तर कवडीपूर येथील पाच नागरिकांचा समावेश आहे. या २२ जणांमध्ये १३ महिला व नऊ पुरूषांचा समावेश आहे. त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
१५ जणांचे अहवाल आले निगेटीव्ह
क्वारंटाईन असलेल्या २२ जणांपैकी १५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सात जणांचे रिपोर्ट अप्राप्त असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी दिली. तूर्तास तालुक्यातील परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन, तहसीलदार प्रा. वैशाख वाहुरवाघ, बीडीओ शिवाजी गवई, मुख्याधिकारी निर्मला राशिनकर, ठाणेदार प्रमेश आत्राम, ठाणेदार प्रदीपसिंह परदेशी परिस्थितीवर नजर ठेवून आहे.