आई-वडील दगावले.. घर ना दार; पण अधिकारी पदाचा दावेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 02:49 PM2022-03-25T14:49:16+5:302022-03-25T15:09:52+5:30

तो लहान असतानाच मजुरी करून परत येणाऱ्या त्याच्या आई-वडिलांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. नातेवाइकांनी अनाथ शंकरला शासकीय बालगृहात दाखल केले. कुणाचीही मदत नसताना बालगृहात राहूनच शंकरने शिक्षण पूर्ण केले.

homeless orphan student's dream to become an officer, urge people to help | आई-वडील दगावले.. घर ना दार; पण अधिकारी पदाचा दावेदार

आई-वडील दगावले.. घर ना दार; पण अधिकारी पदाचा दावेदार

Next
ठळक मुद्देअनाथ शंकरचा नांदेडमध्ये संघर्ष

यवतमाळ : आधीच गरिबी, त्यात बालवयातच आई-वडील दगावले. अनाथ झालेल्या लहानग्या शंकरने तरीही अडचणी झुगारून शिक्षण घेतले; पण आता त्याचा खरा संघर्ष सुरू झाला आहे. स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न या निराधार मुलाने पाहिले आहे. गुणवत्ता त्याच्याकडे ठासून भरलेली आहे. फक्त समाजाच्या हातभाराची तेवढी गरज आहे.

शंकर किसन कनकापुरे या विद्यार्थ्याची ही संघर्षगाथा आहे. उमरखेड तालुक्यातील दुर्गम ब्राह्मणगावात शेतमजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या पोटी त्याचा जन्म झाला. मात्र, तो लहान असतानाच मजुरी करून परत येणाऱ्या त्याच्या आई-वडिलांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी अनाथ शंकरला शासकीय बालगृहात दाखल केले. कुणाचीही मदत नसताना बालगृहात राहूनच शंकरने शिक्षण पूर्ण केले.

दहावी, बारावी झाल्यावर एका दुकानात पार्टटाइम जॉब करीत त्याने मुक्त विद्यापीठातून बीए केले. गरिबी असली तरी शिक्षणाची श्रीमंती त्याने कमावली. कुणाचाही आधार नसताना नांदेड येथे जाऊन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए केले. आता त्याला एमपीएससी, यूपीएससीत यशस्वी होऊन अधिकारी बनायचे आहे. त्यासाठीच त्याने नांदेडच्या एका अकॅडमीमध्ये प्रवेशही मिळविला. मात्र, स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करताना रोजच्या जेवणाची, राहण्याची काळजी त्याला लागत आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी आपल्याला मदत केल्यास आपण आजन्म ऋणी राहू, अशी भावना शंकरने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

बालगृहात असताना व त्यानंतरही यवतमाळच्या बालसंरक्षण कक्षाने तसेच महिला व बालविकास विभागाने मदत केली. आताही शंकरच्या शिक्षणासाठी मदत करण्यास कुणी इच्छुक असल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी केले. नांदेडसारख्या ठिकाणी राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे ही खर्चिक बाब आहे. मात्र, अनाथ असलेल्या शंकरने अन्य कोणत्याही खर्चाची अपेक्षाच ठेवलेली नाही. केवळ अन्न आणि निवारा मिळाला तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करून आपण समाजाचे ऋण फेडू एवढाच निर्धार त्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

Web Title: homeless orphan student's dream to become an officer, urge people to help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.