‘सेवे’च्या शिक्षणासाठी कष्टाचाच ‘होमवर्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:02 PM2017-12-05T22:02:40+5:302017-12-05T22:02:54+5:30

चंद्रमौळी झोपडीतला चेतन... परिस्थितीने गांजला.. पण गुणवत्तेची कास त्याने सोडली नाही. मजुरी करत शिकत आला.

'Homework' for the services of 'Seva' | ‘सेवे’च्या शिक्षणासाठी कष्टाचाच ‘होमवर्क’

‘सेवे’च्या शिक्षणासाठी कष्टाचाच ‘होमवर्क’

Next
ठळक मुद्देहॉटेल टू हॉस्पिटल : ७५ हजारांची फी भरावी कशी? वेणीचा चेतन यवतमाळात अधांतरी

अविनाश साबापुरे ।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : चंद्रमौळी झोपडीतला चेतन... परिस्थितीने गांजला.. पण गुणवत्तेची कास त्याने सोडली नाही. मजुरी करत शिकत आला. लवकर रोजगार मिळावा म्हणून नर्सिंगचा कोर्स केला. आता महिनाभरात अंतिम परीक्षा दिली की नोकरीचा मार्ग मोकळा होणार आहे. पण ७५ हजार रुपयांची फि कुठून भरावी, हा गहन प्रश्न त्याला परीक्षेपूर्वीच नापास करण्याच्या बेतात आहे...
बाभूळगाव तालुक्यातील वेणी नावाच्या खेड्यात या प्रश्नाचा जन्म झाला. गरिबीच्या पोटातूनच स्वाभिमानही जन्माला येतो. चेतन ज्ञानेश्वरराव कामडी हेच त्या स्वाभिमानाचे नाव. वडील मजुरी करतात. घरी चार घासच काय, दिवाबत्तीचीही सोय नाही. राबले तरच जेवले, अशी स्थिती. लहानगा चेतनही कष्ट करत, चार पैसे मिळवत स्वत:चे शिक्षण पूर्ण करीत राहिला. बाभूळगावच्या शिवशक्ती विद्यालयात दहावीत ५३ आणि बारावीत ६८ टक्के गुण मिळविले. आता पुढे कोण शिकवणार आपल्याला? पैसा येणार कुठून? अन् शिकलो तरी नोकरी इतक्या सहज मिळते का? अशा प्रश्नांचा गुंता वाढल्यावर त्याने नर्सिंगचा कोर्स करण्याचा निश्चय केला. तो आहे यवतमाळात. तिथे आपल्याला कोण ठेवणार? तिथली फि १ लाख २० हजार रुपये, ते कोण देणार? चेतनच्या मनातली शिक्षणाची इच्छा संपण्याच्या बेतात असतानाच आत्या धावून आली. तिने फी भरली अन् यवतमाळात नर्सिंगच्या कोर्ससाठी आला.
यवतमाळच्या एका हॉटेलमध्ये काम करायचे आणि स्वत:चा खर्च भागवायचा, हा संघर्ष त्याच्या वाट्याला आला. हॉटेलमध्ये ग्राहकांची सेवा करता-करता तो कॉलेजमध्ये रूग्णांची सेवा कशी करायची, याचेही धडे घेत आहे. साडेतीन वर्षांच्या नर्सिंगच्या कोर्सदरम्यान चेतन दरवर्षी कॉलेजमधून दुसºया क्रमांकाने उत्तीर्ण होतोय. नुकताच त्याला एका खासगी दवाखान्यात तात्पुरता ‘जॉब’ मिळाला. हॉटेलमधून तो हॉस्पिटलमध्ये आला. पण नर्सिंगचे रजिस्ट्रेशन मिळाल्याशिवाय त्याला पक्की नोकरी मिळविता येणार नाही. त्यासाठी अंतिम परीक्षा पास होणे आवश्यक आहे. त्याची फि आहे ७५ हजार रुपये. रिकाम्या झोळीत चार दाणे पडावे आणि तेव्हाच झोळीच्या तळाला छिद्र पडावे... अशीच अवस्था झाली आहे त्याची.

लहानपणापासून काबाडकष्ट उपसून घेतलेले शिक्षण केवळ ७५ हजार रुपयांसाठी वाया जाईल, या एकाच विचाराने सध्या चेतन कासाविस आहे. त्याच्या तळमळीला समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. ही साथ मिळाल्यास त्याच्या पुढील वाटचालीचा मार्ग सुकर होणार आहे.

दोन भाऊ आहेत, तेही वडिलांसोबत मजुरीच करतात. गेल्या वर्षी बहिणीचे लग्न झाले. तेव्हापासून आई सतत आजारी आहे. आता ७५ हजार रुपयांची परीक्षा फि ते कुठून भरतील? त्यांना मी मागू तरी कसा? कुणी तरी मदत केली तरच मी परीक्षा देऊ शकेल.
- चेतन कामडी,
वेणी ता. बाभूळगाव

Web Title: 'Homework' for the services of 'Seva'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.