रक्तफुलांनी सजल्या रानवाटा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 10:15 PM2019-03-03T22:15:05+5:302019-03-03T22:16:03+5:30

वसंत ऋतूची चाहूल लागली की, पानगळतीने अवघे जंगल गलबलून जाते. एरव्ही निरव शांत आणि स्थितप्रज्ञ राहणारे शिवार, उन्हाळ्यातील चकाकणाऱ्या तप्त सूर्यप्रकाशात वाऱ्याच्या हलक्या झुळूकीने हळूवार डोलायला लागते. पानांच्या गळतीने झाडांच्या ओळीत सळसळ वाढते.

Honeyflowers! | रक्तफुलांनी सजल्या रानवाटा...!

रक्तफुलांनी सजल्या रानवाटा...!

Next
ठळक मुद्देवसंतातला बहर : केशरी रंगछटांनी उजळले शिवार, दऱ्याखोऱ्यात फुलण्याचा उत्सव

संतोष कुंडकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वसंत ऋतूची चाहूल लागली की, पानगळतीने अवघे जंगल गलबलून जाते. एरव्ही निरव शांत आणि स्थितप्रज्ञ राहणारे शिवार, उन्हाळ्यातील चकाकणाऱ्या तप्त सूर्यप्रकाशात वाऱ्याच्या हलक्या झुळूकीने हळूवार डोलायला लागते. पानांच्या गळतीने झाडांच्या ओळीत सळसळ वाढते. ईकडे पळस वृक्षे वसंतोत्सवासाठी फुलारून येतात. बहर वेगाने वाढतो अन् अवघ्या वनराईतील रानवाटा रक्तफुलांच्या केशरी रंगछटांनी उजळून निघतात.
गुजरातीत खाकेरा, संस्कृतमध्ये पलाश, त्रिपत्रक, रक्तपुष्पक तर इंग्रजी भाषेत फ्लेम आॅफ द फॉरेस्ट अशा विविध नावांनी ओळखला जाणारा मराठी भाषेतील पळस सध्या रानावनात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पिवळ्या आणि केशरी अशा दोन रंगात उमलणारी पळसाची फुलं तशी सर्वांच्याच जिव्हाळ्याची. रंगपंचमी आली की, जुन्या पिढीला पळसफुलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पूर्वी रंगपंचमीला पळसफुलांचाच रंग उधळला जात असे. उन्हाळ्याच्या सुरूवातीला म्हणजेच वसंत ऋतूच्या सुरूवातीला पळसवृक्ष पानांचे नवे आवरण पांघरतो, तर वसंत पंचमीला तो फुलांनी सजतो. मिश्र मोसमी जंगलात अस्तित्व दाखविणारा पळस राज्यभर दृष्टीपथास पडतो. दूर डोंगरदऱ्यावर नजर फिरविली की, पेटणारी ज्योत जशी हवेमुळे लहानमोठी होताना दिसते, तशीच ही पळसफुलं दिसायला लागतात. म्हणूनच ब्रिटीश राजवटीतील गोऱ्या साहेबांनी या फुलांना ‘फ्लेम आॅफ द फॉरेस्ट’ असे नाव दिले असावे. रानात असा उमलण्याचा उत्सव सुरू असताना पळसफुलांपाठोपाठ पांगारा, आंबा, काटसावरीची झाडंही फुलांवर येतात.
हिवाळा संपला की, जंगलातील पानवठे आटायला सुरूवात होते. उन्हाचा तडाखा वाढतो. ही रानफुलं मग जंगलातील व्याकूळ पाखरांना तहानभूक भागविण्यासाठी स्वत:तील द्रव पुरवितात आणि म्हणूनच तापत्या उन्हात या फुलारलेल्या झाडांवर मैना, पोपट, बुलबुल, नाचरा, कोतवाल, दयाळ असे अनेक पक्षी आणि मधमाश्या, मुंग्या यांची जत्राच भरते. एक जीव (पळसफुलं) दुसऱ्या जीवाला जीवनरस वाटत आहे, असे मनोहारी दृष्य रानावनात पहायला मिळते.

बहुउपयोगी पळसाची होतेय निर्दयपणे कत्तल
पळसाची आंतरसाल महिलांच्या विविध आजारावर रामबाण समजली जाते. पळसफुलांचा काढा किंवा रस तापशमक आहे. उन्हाळीच्या विकारावर तो उपयुक्त ठरतो. पळसाच्या बिया (पळसपापडी) कृमीनाशक व विरेचक म्हणून वापरल्या जातात. मात्र जलतन व होळीच्या नावावर पळसाची कत्तल होते.

Web Title: Honeyflowers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.