पोळ्यानिमित्त करणार शेतकऱ्यांचा सन्मान
By admin | Published: August 29, 2016 12:57 AM2016-08-29T00:57:58+5:302016-08-29T00:57:58+5:30
तालुक्यातील घोन्सा येथील ग्रामपंचायत कार्यालय व विविध संघटनेतर्फे येत्या १ व २ आॅगस्ट रोजी पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे
घोन्सा ग्रामपंचायतीचा उपक्रम : बैलजोडी, नंदीबैल सजावट स्पर्धा
वणी : तालुक्यातील घोन्सा येथील ग्रामपंचायत कार्यालय व विविध संघटनेतर्फे येत्या १ व २ आॅगस्ट रोजी पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच बैलजोडी व नंदीबैल सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहे.
गेल्या महिनाभरपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी पोळा सणावर दु:खाचे साटव पसरल्यामुळे ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनात विविध समितीने पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचे ठरविले आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालय, तंटामुक्त ग्राम समिती, ग्रामविकास सहकारी संस्था, मच्छि व्यवसाय संस्था, संत गजानन महाराज श्रद्धाश्रम, ग्राम शिक्षण समिती, दक्षता समिती, वनहक्क समिती, हनुमान देवस्थान समिती, बळीराजा चेतना समिती, वेकोलि कामगार संघ कुंभारखणीतर्फे १ व २ आॅगस्ट रोजी पोळ्यानिमित्त येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बैलजोडी व नंदीबैल सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच याच कार्यक्रमात गुढीधारक शेतकऱ्यांचा न्यू आदर्श व्यापारी गणेश मंडळातर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. बैैलजोडी सजावट स्पर्धेत उत्कृष्ट सजावट, एकरंगी जोडी व उत्कृष्ट पोस, अशा तीन गटात प्रत्येक पाच बक्षिसे देण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी तान्हा पोळ्यानिमित्त नंदीबैैल सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील १० विजेत्यांना बक्षिस देण्यात येईल. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी न्यू आदर्श गणेश मंडळ, शिवराया युवक मंडळ, व्यापारी गणेश मंडळ, शिवशक्ती गणेश मंडळ, पंचशील युवा मंडळ, बिरसा मुंडा युवक मंडळ, गुरूदेव सेवा मंडळ, महिला बाल युवक व गजानन पदावली भजन मंडळ परीश्रम घेत आहे. या स्पर्धेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)