जिल्हा परिषदेत मानापमान नाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 09:23 PM2019-01-28T21:23:20+5:302019-01-28T21:23:39+5:30
महिला व बालकल्याण विभागातर्फे सोमवारी माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मूळ गुंतवणूक प्रमाणपत्र वितरण सोहळ्यावरून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांत मानापमान नाट्य रंगले. महिला व बालकल्याण विभागातर्फे सोमवारी जिल्हा परिषद बचत भवनात प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महिला व बालकल्याण विभागातर्फे सोमवारी माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मूळ गुंतवणूक प्रमाणपत्र वितरण सोहळ्यावरून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांत मानापमान नाट्य रंगले.
महिला व बालकल्याण विभागातर्फे सोमवारी जिल्हा परिषद बचत भवनात प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित होता. सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते केले जाणार होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे राहणार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार, आमदार श्रीकांत देशपांडे उपस्थित राहणार होते. याशिवाय खासदार भावना गवळी, खासदार राजीव सातव, आमदार हरिभाऊ राठोड, आमदार प्रा.डॉ.तानाजी सावंत, आमदार ख्वाजा बेग, आमदार अॅड.निलय नाईक, आमदार डॉ.वजाहत मिर्झा विशेष अतिथी म्हणून तर जिल्ह्यातील इतर सर्व आमदार विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र या कार्यक्रमाकडे सर्वांनी पाठ फिरविली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष माधुरी आडे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत अडगळीच्या ठिकाणी टाकण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिकाºयांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली. यातूनच महिला व बालकल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर व समाजकल्याण सभापती वगळता इतर पदाधिकाºयांनी कार्यक्रमावर अघोषित बहिष्कार टाकला. अखेर अरुणाताई खंडाळकर यांनीच उद्घाटन केले. काही पदाधिकाºयांनी दौरा, तर काहींनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगून कार्यक्रमाला जाण्याचे टाळले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव हे कार्यक्रमाचे विनीत होते. त्यांनी निमंत्रण पत्रिका तयार केली. मात्र त्याच निमंत्रण पत्रिकेवरून पदाधिकाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्याची परिणिती अघोषित बहिष्कारात झाल्याची चर्चा सुरू होती.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात आहे. त्यामुळे कार्यक्रमाला जाणे शक्य झाले नाही. तथापि, कोणत्याही कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून सन्मान जपला जाणे आवश्यक आहे. कोणत्याही कार्यक्रमात अध्यक्षपदाची अप्रतिष्ठा होऊ देणार नाही.
- माधुरी आडे
अध्यक्ष, जिल्हा परिषद यवतमाळ