वेतनासाठी आशा स्वयंसेविकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:21 PM2019-06-19T22:21:17+5:302019-06-19T22:22:50+5:30
गावपातळीवर आरोग्य सेवा देणाऱ्या आशांनी मानधन नको, वेतन द्यावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यात आंदोलन पुकारले. यवतमाळातील तिरंगा चौकात महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी धरणे दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गावपातळीवर आरोग्य सेवा देणाऱ्या आशांनी मानधन नको, वेतन द्यावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यात आंदोलन पुकारले. यवतमाळातील तिरंगा चौकात महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी धरणे दिले.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आशा आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. असे असतानाही त्यांना कामाचा अल्पच मोबदला मिळतो. यामुळे आशांना कुटुंब चालविणेही अवघड झाले आहे. यामुळे आशांचा मानधनात वाढ करण्यात यावी. आशांना किमान वेतन १८ हजार आणि गटप्रवर्तकांना २१ हजाराचे दरमहा वेतन देण्यात यावे. ही प्रमुख मागणी आशांनी लावून धरली.
आरोग्य क्षेत्रातील रिक्तपद भरण्यात यावे. शासनाच्या आरोग्य खात्यातील रिक्तपदांवर आशा आणि गटप्रवर्तकाची नेमणूक करण्यात यावी. जननी शिशू सुरक्षा योजनेच्या लाभासाठी दारिद्र्यरेषेची अट शिथील करण्यात यावी.
यासह विविध मागण्याचा यामध्ये समावेश आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे, कार्याध्यक्ष दिवाकर नागपुरे, जिल्हासचिव संजय भालेराव, नानासाहेब उईके, विद्या मुनेश्वर, उषा मुर्खे, बबीता पेंदोर यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.