भीषण! मोबाईल फोडल्याने मुलाने केला बापाचा खून; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:59 PM2020-05-18T17:59:00+5:302020-05-18T18:00:38+5:30
मुलगा सतत मोबाईलच्या नादी असतो तो कोणतेच काम करीत नाही हे पाहून संतापलेल्या वडिलाने मुलाचा चार्जिंग असलेला मोबाईल फोडला. यावरून संतापलेल्या मुलाने थेट वडिलावर हल्ला चढवत खाटेच्या ठाव्याने जीव जाईपर्यंत डोक्यात प्रहार केले. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास हिवरासंगम येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मुलगा सतत मोबाईलच्या नादी असतो तो कोणतेच काम करीत नाही हे पाहून संतापलेल्या वडिलाने मुलाचा चार्जिंग असलेला मोबाईल फोडला. यावरून संतापलेल्या मुलाने थेट वडिलावर हल्ला चढवत खाटेच्या ठाव्याने जीव जाईपर्यंत डोक्यात प्रहार केले. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास हिवरासंगम येथे घडली.
मुलगा १६ वषार्चा असल्याने विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणून त्याच्याविरोधात महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विधीसंघर्षग्रस्त बालक हा गावातीलच ट्रकवर क्लिनर म्हणून कामाला होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या हाताला काम नव्हते, यावरूनच वडील सतत त्याला काही कामधंदा करीत नाही, मोबाईलवर खेळत राहतो असे टोमणे मारत होते. यातूनच दोघा बापलेकात वाद पेटला. वडिलाने रागाच्या भरात घरात चार्जिंग लावलेला मोबाईल फोडला. हे पाहून मुलाने थेट वडिलाला मारायला सुरुवात केली. हाणामारी करीत असतानाच मुलाच्या हातात खाटेचा ठावा लागला. त्याने त्या ठाव्यानेच वडिलांच्या डोक्यावर प्रहार केला. यात रक्ताच्या थारोळ्यात कोसळून वडिलाचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या काकाला माहीत झाला. त्यांनी तातडीने धाव घेऊन मुलाच्या तावडीतून वडिलाची सुटका केली. तो काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हता, शेवटी विधीसंघर्षग्रस्त बालकाला दोरीने खांबाला बांधून ठेवले. घटनेची माहिती पोलीस पाटील प्रवीण कदम यांना दिली. त्यांनी महागाव ठाणेदारांना या घटनेबाबत सांगितले. महागाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. मुलगा व वडील दोघांनाही दारूचे व्यसन असल्याचे सांगण्यात येत आहे.
वडिलाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
मोबाईल फोडल्याचा राग आल्याने विधीसंघर्षग्रस्त बालकाने वडिलाला डोक्यावर प्रहार करून गंभीर जखमी केले. अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या वडिलाला तुराट्याच्या गंजीवर ठेऊन पेटवून देण्याच्या तयारीत विधीसंघर्षग्रस्त बालक होता. तो मधे पडलेल्या काकालाही जुमानत नव्हता. अखेर त्याला शेजाऱ्यांच्या मदतीने खांबाला बांधून ठेवले. झटापटीत त्याला वेळेवर आगपेटी मिळाली नाही. त्यामुळे वडिलाला अर्धमेल्या अवस्थेत जाळता आले नाही. मात्र डोक्यावर गंभीर जखम झाल्याने वडिलांचा काही क्षणातच मृत्यू झाला.