विभागीय महसूल आयुक्तांकडून झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:53 AM2017-07-19T00:53:03+5:302017-07-19T00:53:03+5:30
विभागीय महसूल आयुक्त पीयुष सिंग यांनी मंगळवारी जिल्हादिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली.
विकास कामांचा आढावा : महसूल, पंचायत विभागाची बैठक, कामकाजाच्या गतीवर नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विभागीय महसूल आयुक्त पीयुष सिंग यांनी मंगळवारी जिल्हादिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत पीक कर्ज वाटप आणि अखर्चित निधीवरून त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
आयुक्त पियुष सिंग मंगळवारी सगाळीच जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत महसूल वसुली, तूर खरेदीची सद्यस्थिती, शेतकरी आत्महत्या, नैसर्गिक आपत्ती, जलयुक्त शिवार, नरेगा, पीक कर्ज वाटप व विमा, सध्याची पीक स्थिती, सिंचन अनुशेष, नॅशनल हायवे भूसंपादन, वृक्ष लागवड, वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग भूसंपादन, धडक सिंचन विहिरी, पंतप्रधान आवास योजना आदींचा आढावा घेतला. पीक कर्ज वाटपावरून त्यांनी नाराजी दर्शविली.
यानंतर आयुक्तांनी जिल्हा परिषदेत धडक देत विविध योजनांचा आढावा घेतला. यात जिल्हा परिषदेकडे तब्बल ४६ कोटींच्यावर निधी अखर्चित राहिल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. या बैठकीत त्यांनी ग्रामीण घरकूल योजना, जीवन्नोती अभियान, स्वच्छ भारत मिशन, आपले सरकार सेवा केंद्र, सांसद आदर्श ग्राम योजना, जलस्वराज्य प्रकल्प, सर्व शिक्षा अभियान, कृषी पंपांना वीज पुरवठा, मागेल त्याला शेततळे, वार्षिक तपासणी अहवालाचे वाचन, सेवानिवृत्ती प्रकरणे, निलंबित कर्मचारी आदींचा आढावा घेतला.