निधीअभावी रुग्णालयातील औषधी संपण्याचा धोका ! राष्ट्रीय आरोग्य अभियानाची स्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:12 IST2025-04-02T11:11:09+5:302025-04-02T11:12:16+5:30

Yavatmal : केंद्राने पाचव्या हप्त्याची रक्कमच दिली नाही

Hospitals at risk of running out of medicines due to lack of funds! The situation of the National Health Mission is critical | निधीअभावी रुग्णालयातील औषधी संपण्याचा धोका ! राष्ट्रीय आरोग्य अभियानाची स्थिती गंभीर

Hospitals at risk of running out of medicines due to lack of funds! The situation of the National Health Mission is critical

विलास गावंडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
आरोग्यसेवेचा डोलारा सांभाळत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानात (एनआरएचएम) निधीचा ठणठणाट आहे. औषधांसाठीही पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने तातडीने निधी वितरित न केल्यास आरोग्य यंत्रणेवर मोठे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी केंद्र सरकारकडून राज्य आरोग्य सोसायटीला टप्प्याटप्प्याने निधी दिला जातो. पहिला हप्ता मे महिन्यात मिळतो आणि आतापर्यंत चार हप्ते प्राप्त झाले आहेत. मात्र, डिसेंबर महिन्यात अपेक्षित असलेला पाचवा हप्ता केंद्र सरकारने अद्याप जारी केलेला नाही. निधीअभावी आरोग्य सोसायटीने आतापर्यंत कामकाज चालवले असले, तरी आता परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. आरोग्य व्यवस्थेतील निधीचा हा ठणठणाट वेळीच दूर न केल्यास आरोग्य सेवा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


रुग्णवाहिका थांबतील
अभियानात पैसा नसल्याने रुग्णवाहिकांच्या इंधनाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. आतापर्यंत जवळ असलेल्या निधीतून किंवा उधारीवर काम भागविण्यात आले. पुढे तेही शक्य होणार नसल्याने रुग्णवाहिका बंद राहतील. अत्यावश्यक वेळी हे वाहन उपलब्ध न झाल्यास रुग्णांच्या जीविताला थोका पोहोचण्याची भीती आहे.


कर्मचाऱ्यांचे मानधन थांबले
राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत विविध संवर्गातील ३० हजारांवर कर्मचाऱ्यांचे मानधन थांबले आहे.
फेब्रुवारीचे मानधन मिळाले नाही. आता मार्च महिनाही संपला आहे. घरखर्च चालवायचा कसा, हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. स्टाफ नर्स, वाहनचालक, कार्यक्रम सहायक, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, लेखापाल, समूह संघटक आदी संवर्गातील कर्मचारी या अभियानात आपली सेवा देत आहेत. 


कल्याणकारी योजना थांबतील
'एनआरएचएम'च्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांना निधीअभावी ब्रेक लागण्याची शक्यता आहे. आरोग्य तपासणी शिबिरासह वेळोवेळी हाती घेतले जाणारे उपक्रम थांबतील. स्थानिक पातळीवरून निधीसाठी पाठपुरावा करूनही मागणी पूर्ण झाली नसल्याचे सांगितले जाते.


निधी येताच वितरित होईल
शिल्लक असलेला निधी खर्च करा, केंद्र व राज्यस्तरावरून निधी उपलब्ध होताच वितरित केला जाईल, असे वित्त व लेखा संचालकांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी निधीच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.


औषधपुरवठा प्रभावित होणार
रुग्णालयासाठी खरेदी केल्या जात असलेल्या औषध, गोळ्या आणि तत्सम साहित्याचाही प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती आहे. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी औषधी उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे आरोग्यसेवा प्रभावित होण्याची भीती आहे.


'लिमिट्स'

  • वापरण्याचा सल्ला सद्यस्थितीत निधीची कमतरता लक्षात घेता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत शिल्लक असलेल्या 'लिमिट्स' कर्मचाऱ्यांच्या मानधनावर वापरण्याचा सल्ला राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक (वित्त व लेखा) यांनी दिला आहे.
  • क्षेत्रीय स्तरावर उपलब्ध असलेल्या 3 लिमिट्सची माहिती मागितली असता काही प्रमाणात निधी उपलब्ध असल्याचे दिसून येते.
  • त्यातील पैसा मानधनासाठी वापरण्यात यावा, असे संचालकांनी ३१ मार्च २०२५ रोजी प्रसारित केलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Hospitals at risk of running out of medicines due to lack of funds! The situation of the National Health Mission is critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.