मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 10:22 PM2017-12-03T22:22:06+5:302017-12-03T22:23:01+5:30
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा-कुणबी समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृहे उभारणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली. ते येथील मराठा-कुणबी समाज राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळाव्यात बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा-कुणबी समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृहे उभारणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली. ते येथील मराठा-कुणबी समाज राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळाव्यात बोलत होते.
येथील शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंगच्या प्रांगणात रविवारी पाचवा राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटक म्हणून बोलताना रणजित पाटील म्हणाले, मराठा समाज हा संवेदनशील आहे. सर्व समाज घटकांना न्याय देणारा आहे. या समाजावर सरस्वती प्रसन्न असून लक्ष्मी रुसलेली आहे. त्यामुळे मराठा समाजाने काळाची पावले ओळखून बदलले पाहिजे, त्यासाठी मेळाव्यांच्या माध्यमातून समाज एकसंघ राहणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भावनाताई गवळी, माजी खासदार सदाशिव ठाकरे, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे व संजय देशमुख, माजी आमदारद्वय अॅड. अनंतराव देवसरकर व विजय पाटील चोंढीकर, जीवन पाटील, विठ्ठलराव गावंडे, बाबूराव कदम, महादेव सुपारे, तातू देशमुख, रवींद्र अरगडे, जयवंतराव पाटील, नामदेवराव केशवे, चितांगराव कदम, दिगांबर जगताप, राजू बुटले, संगीता घुईखेडकर, दीपाली जाधव, वर्षा पाटील, कविता मुळे आदी उपस्थित होत्या.
एक लाखाची देणगी
विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी समाजाच्या अभ्यासिकेसाठी वैयक्तिक एक लाख रुपये देणगी देण्याची घोषणा केली. माजी आमदार अॅड. अनंतराव देवसरकर यांनी संभाजीनगरातील पाच हजार स्वेअरफूट जागा समाजाच्या वसतिगृह व अभ्यासिकेसाठी देण्याची जाहीर केले. इतरही मान्यवरांनी यासाठी विविध स्वरूपाच्या देणग्यांची घोषणा केली.