यवतमाळ जिल्ह्यातील जवळा येथे बोअरवेलमधून येतेय गरम पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 11:59 AM2021-07-15T11:59:15+5:302021-07-15T12:05:01+5:30

Yawatmal News महागाव तालुक्यातील अंबोडा येथील बोअरवेलमधून गरम पाणी येत असलेल्या प्रकाराची शाही वाळते न वाळते तोच आर्णी तालुक्यातील लोणी येथील बोअरवेलमधून गरम पाणी निघत असल्याचे दिसून आले.

Hot water comes from a borewell near Javatmal district | यवतमाळ जिल्ह्यातील जवळा येथे बोअरवेलमधून येतेय गरम पाणी

यवतमाळ जिल्ह्यातील जवळा येथे बोअरवेलमधून येतेय गरम पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देगावकऱ्यांमध्ये आश्चर्यासह भीती

आसिफ शेख

 लोकमत न्यूज नेटवर्क  
 यवतमाळ: महागाव तालुक्यातील अंबोडा येथील बोअरवेलमधून गरम पाणी येत असलेल्या प्रकाराची शाही वाळते न वाळते तोच आर्णी तालुक्यातील लोणी येथील बोअरवेलमधून गरम पाणी निघत असल्याचे दिसून आले. या अजब प्रकाराने गावकऱ्यांमध्ये आश्चर्यासह भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महागाव तालुक्यात रविवारी मुडाणानजीक भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मराठवाड्यात त्याचे धक्के जाणवले. त्यानंतर त्याच तालुक्यातील अंबोडा येथे एका बोअरवेलमधून गरम पाणी निघत असल्याची वार्ता पसरली. भूकंपामुळे हा प्रकार चर्चेचा विषय ठरला. असाच प्रकार आता आर्णी तालुक्यातील लोणी येथे उघडकीस आला आहे.

लोणी येथील साहेबराव पानचोरे यांच्या घरी बोअरवेल आहे. त्या बोअरवेलमधूनही गरम पाणी निघत आहे. पानचोरे यांनी सहा वर्षांपूर्वी आपल्या अंगणात बोअरवेल खोदली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यातून गरम पाणी निघत आहे. सुरुवातीला अत्यंत कमी प्रमाणात गरम पाणी निघत होते. मात्र, गेल्या दोन-चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गरम पाणी निघत आहे. याबाबत नीलेश पानचोरे यांनी आर्णी तहसीलदार परशराम भोसले व तलाठी भाऊ उबाळे यांना माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकाराने गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. सोबतच त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बोअरवेलमधून निघणारे गरम पाणी बघण्यासाठी परिसरातील नागरिक पानचोरे यांच्या घरी गर्दी करीत आहे. भूकंपानंतर गरम पाण्याचे प्रमाण वाढल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. आता प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यामुळे प्रशासन नेमकी कोणती उपाययोजना करते याकडे लक्ष लागले आहे.

अंबोडा येथील पाणी वापर बंदचे आदेश

महागाव तालुक्यातील अंबोडा येथील महादेवराव भोयर यांच्या अंगणातील बोअरवेलमधूनही गरम पाणी निघत आहे. मात्र, या गरम पाण्याचा भूकंपाशी संबंध नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, बुधवारी जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या चमूने या हातपंपाची पाहणी केली. त्यांनी पाण्याची तपासणी केली. हातपंपातून ४० डिग्री उष्ण पाणी येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे चमूने या पाण्याचा वापर बंद करण्यास सांगितले. भूकंपानंतर भूगर्भात बदल झाल्याचा हा परिणाम असावा, अशी आर्णी व महागाव तालुक्यांतील जनतेत चर्चा आहे.

Web Title: Hot water comes from a borewell near Javatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.