लग्नाला जाणे पडले महागात; चोरट्यांनी साधला डाव, ५० तोळ्यांच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास
By सुरेंद्र राऊत | Published: December 15, 2022 06:16 PM2022-12-15T18:16:06+5:302022-12-15T18:19:55+5:30
उमरखेडमध्ये ३३ लाखांची घरफोडी, बसस्थानकासमोरच चोरट्यांनी साधला डाव
उमरखेड (यवतमाळ) : घरात मुलीचे लग्न ठरल्याने आई-वडिलांनी तिच्यासाठी मोठ्या कष्टाने एकएक दागिना तयार केला. घराचा लग्नसोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला. त्यामुळे दाग-दागिने व इतरही ऐवज याचीही जुळवाजुळव सुरू होती. नात्यातील लग्न सोहळ्याला माहूर येथे गेलेल्या या कुटुंबावर मोठा आघात झाला. १३ डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी डाव साधला. रोख रकमेसह ३२ लाख ४० हजारांंचा मुद्देमाल चोरट्यांनी उडविला. ही घटना १४ डिसेंबरच्या सायंकाळी उघडकीस आली.
येथील बसस्थानकासमोर कैलास शिंदे यांचे घर आहे. ते मंगळवारी लग्नकार्यासाठी परिवारासह माहूर येथे गेले होते. बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ते घरी परतले. त्यांंना घराचे दार व कुलूप सुस्थितीत दिसले. आत प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील दृश्य पाहून शिंदे दाम्पत्यांना धक्काच बसला. कपाटं फुटलेली होती.
साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते. मुलीच्या लग्नासाठी आणलेले ५० तोळे सोन्याचे दागिने, अडीच किलो चांदीचे दागिने, रोख ८० हजार हा ऐवज दिसत नव्हता. हे पाहून कैलास हरिभाऊ शिंदे यांच्या पत्नीला भोवळ आली. नेमके काय झाले हे समजले नाही. पत्नीला सावरत शिंदे यांनी आपबिती आपल्या पुतण्यांना सांगितली. ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काका-काकू दोघांनाही धीर देत बाहेर आणले. नंतर या घटनेची माहिती उमरखेड पोलिसांना देण्यात आली. तत्काळ पोलिस घटनास्थळी पोहोचले. चोरीचा प्रकार कसा झाला, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
सीसीटीव्ही फुटेजवर लक्ष
घटनास्थळावर श्वान पथक, ठसेतज्ज्ञ यांच्यासह सायबर सेललाही पाचारण करण्यात आले आहे. सर्वप्रथम पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला जात आहे. आरोपी किती, कसे आले, यावरून गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यवतमाळ शहरात तीन दिवसांपूर्वी २७ लाखांची घरफोडी झाली. यातीलही आरोपी अजून हाती लागलेेले नाहीत. यापूर्वीच्या अनेक चोऱ्या अनडिटेक्ट आहेत.