घरकुलाचे ‘जनधन’ येते आणि जाते..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:14 PM2017-11-08T23:14:53+5:302017-11-08T23:16:12+5:30
पंतप्रधानांनी राबविलेली जनधन बँक खात्यांची संकल्पना आता पंतप्रधानांच्या नावाने सुरू असलेल्या घरकुल योजनेतच अडसर ठरू लागली आहे.
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पंतप्रधानांनी राबविलेली जनधन बँक खात्यांची संकल्पना आता पंतप्रधानांच्या नावाने सुरू असलेल्या घरकुल योजनेतच अडसर ठरू लागली आहे. जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजनेत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या जनधन खात्यात ६० हजार रुपयांचा निधी जमा होतोय. पण या खात्यातून ५० हजारांपेक्षा जास्त विड्रॉल करता येत नसल्याने हा निधी योजनेच्या राज्यस्तरीय बँक खात्यात परत जातोय.
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेत २०१६-१७ मध्ये ९ हजार ६६ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे. त्यांना पहिल्या टप्प्यातील ३० हजार रुपये मिळाले. मात्र बांधकाम अर्धवट झालेले असताना दुसºया टप्प्यातील ६० हजारांचा निधी खात्यात येऊनही लाभार्थ्यांना मिळेनासा झाला. कारण बहुतांश लाभार्थ्यांनी या योजनेत जनधन खात्याचाच क्रमांक दिला आहे. या खात्यात ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्यास ती विड्रॉल करता येत नाही. परंतु, योजनेच्या सॉफ्टवेअरमध्ये पैसे अदा झाल्याबाबत ‘क्रेडिट कन्फर्मेशन’ असा संदेश येतो. प्रत्यक्षात हा निधी लाभार्थ्यांना न मिळता योजनेच्या केंद्रीय खात्यात जमा होत आहे. अशी अनेक प्रकरणे निस्तरता निस्तरता संबंधित गटविकास अधिकाºयांच्या नाकीनऊ येत आहे.
पूर्वीप्रमाणे योजनेचा निधी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून न येता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जात आहे. त्यामुळे जनधनचा घोळ निस्तरणे जिल्हास्तराच्या आवाक्याबाहेर गेले. प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणेच रमाई आवास योजना आणि शबरी आदिवासी घरकुल योजनेतही लाभार्थ्यांनी जनधनचीच खाती दिलेली असून निधी येऊनही विड्रॉलच्या अडचणी निर्माण होत आहेत.
घरकुलांचे ‘टार्गेट’ घटले
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेत २०१७-१८ वर्षाकरिता ४ हजार ६६९ लाभार्थ्यांचे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. रमाई आवास योजनेतून १ हजार ८३२ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. तर शबरी आदिवासी घरकुल योजनेत ५७९ लाभार्थी निवडण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी विविध योजनेतून १२ हजार घरकुलांना मंजुरी मिळालेली असताना यंदा टार्गेट घटवून केवळ ७ हजार ८० घरकुले होण्याची शक्यता आहे. शिवाय पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेतून ६५ लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा घेण्याकरिता ५० हजारांचा निधी मिळणार आहे.
अखेर निधीचे टप्पे वाढ
घरकुल योजनेचे १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान ३ टप्प्यात देण्यात येते. पहिला आणि तिसरा टप्पा ३० हजारांचा असला तरी दुसरा टप्पा ६० हजारांचा असल्याने जनधनमधून तो विड्रॉल होत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने आता निधी वितरणाचे पाच टप्पे पाडून दिले आहेत. पहिले तीन टप्पे प्रत्येकी ३० हजारांचे असतील, चौथा टप्पा २० हजारांचा तर पाचवा टप्पा १० हजार रुपयांचा असेल. या पाच टप्प्यात जमा झालेला निधी जनधनच्या खात्यातून लाभार्थ्यांना सहज काढता येणार आहे.