वडिलांचे कलेवर घरात असताना जुळ्या बहिणींनी दिला दहावीचा पेपर
By admin | Published: March 8, 2015 02:00 AM2015-03-08T02:00:53+5:302015-03-08T02:00:53+5:30
वर्षभर दहावीचा चिकाटीने अभ्यास केला. इंग्रजीच्या पेपरच्या आदल्या दिवशी वडिलांचे हृदयाघाताने निधन झाले.
यवतमाळ : वर्षभर दहावीचा चिकाटीने अभ्यास केला. इंग्रजीच्या पेपरच्या आदल्या दिवशी वडिलांचे हृदयाघाताने निधन झाले. वडिलांचे कलेवर घरात असताना हृदयावर दगड ठेवत जुळ्या बहिणींनी दहावीचा पेपर दिला. नियतीने कुणावरही आणू नये, असा प्रसंग या दोन बहिणीवर आला. यवतमाळच्या शहीद सोसायटीतील या जुळ्या बहिणींना शनिवारी दुहेरी परीक्षेला सामोरे जावे लागले.
यवतमाळातील व्यावसायिक जोएफ अली ताजुद्दीन लिराणी (४२) यांचे अमरावती येथे शुक्रवारी हृदयाघाताने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त घरी कळताच परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. प्रत्येकजण धाय मोकलून रडत होता. अशातच दहावीत असणाऱ्या नमीरा आणि इनारा या दोन मुलींचा शनिवारी इंग्रजीचा पेपर होता. वडिलांच्या निधनाने या दोन मुलींचे विश्वच हरविले होते. आता या मुलींच्या परीक्षेचे काय होणार, असा प्रश्न नातेवाईकांना पडला. वडिलांचे कलेवर पाहून धाय मोकलून रडणाऱ्या नमिरा आणि इनाराने मात्र परीक्षेला जायचा निर्णय घेतला. घरात वडिलांचे कलेवर असताना हृदयावर दगड ठेवून या दोन बहिणी इंग्रजीच्या पेपरसाठी शहरातीलच एका परीक्षा केंद्रावर पोहोचल्या. परीक्षेत मन लागत नव्हते. मात्र वर्ष वाया जाईल यातून या दोघीही जुळ्या बहिणींनी महत्प्रयासाने पेपर लिहिला.
(नगर प्रतिनिधी)
आगळी-वेगळी श्रद्धांजली
जोएफचे आपल्या नमिरा आणि इनारा या दोन मुलींवर जिवापाड प्रेम होते. पहिल्या पेपरला जोएफ आपल्या दोन्ही मुलींना घेऊन परीक्षा केंद्रावर गेले होते. परीक्षेच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. इंग्रजीच्या पेपरच्या आदल्या दिवशी जोएफ यांचे निधन झाले. घरात वडिलांचे कलेवर होते. मात्र त्याचवेळी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या परीक्षा केंद्रावर पोहोचल्या आणि वडिलांना आगळी-वेगळी श्रद्धांजली अर्पण केली.