शेलू येथे शॉर्टसर्किटमुळे घराला भीषण आग
By admin | Published: February 12, 2017 12:20 AM2017-02-12T00:20:41+5:302017-02-12T00:20:41+5:30
येथून जवळच असलेल्या शेलू खुर्द येथील शेतकरी बबन नीळकंठ पारटकर या शेतकऱ्याच्या घराला शनिवारी दुपारी अचानक आग लागली.
मोठे नुकसान : गावकऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
नांदेपेरा : येथून जवळच असलेल्या शेलू खुर्द येथील शेतकरी बबन नीळकंठ पारटकर या शेतकऱ्याच्या घराला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत घरातील साहित्यासह कापूस जळून खाक झाला. यात अंदाजे ७० हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येते.
दुपारी ३ वाजताच्या सुमारास पारटकर यांच्या घरातून आगीचे लोळ उठत असल्याचे दिसताच, गावकऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे घरात गॅस सिलिंडर होते. मात्र गावकऱ्यांनी सिलिंडरला आगीच्या विळख्यातून बाहेर काढले. अन्यथा सिलिंडरचा स्फोट झाला असता.
आग लागल्यानंतर सरपंच रत्नमाला बेलेकर यांनी तातडीने तहसीलदार रविंद्र जोगी यांना दूरध्वनीवरून आगीची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र दल पोहचेस्तोवर गावकऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. (वार्ताहर)