उटी येथील घरकुल लाभार्थी प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:40 AM2021-04-25T04:40:40+5:302021-04-25T04:40:40+5:30
महागाव : तालुक्यातील उटी येथील खरे, गरजू लाभार्थी घराकुलापासून वंचित आहे. त्यांना तीन पिढ्यांपासून शासनाच्या योजनांचा कोणताच लाभ मिळाला ...
महागाव : तालुक्यातील उटी येथील खरे, गरजू लाभार्थी घराकुलापासून वंचित आहे. त्यांना तीन पिढ्यांपासून शासनाच्या योजनांचा कोणताच लाभ मिळाला नाही.
पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून मिळणारे घरकुल गोरगरिबांसाठी स्वप्नवत ठरते. मात्र, गेल्या तीन पिढ्यांपासून शासनाचा कोणताच लाभ मिळाला नसल्याचे असे अनेक उदाहरणे उटी या छोट्याशा गावात अनुभवायला मिळतात. तेथील वंचित लाभार्थींनी आपली कैफीयत मांडली. भूमिहीन असलेले कुटुंब मागील अनेक वर्षांपासून पडक्या घरात राहून उपजीविका चालविते.
रखमाबाई नारायण कोळेकर यांना दोन मुले आहेत. त्या मुलांपासून विभक्त राहतात. दररोज मजुरी करून उपजीविका चालवितात. अशी अनेक कुटुंबे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. ३७०० लोकसंख्या असलेल्या उटी गावाची सातासमुद्रापार ख्याती आहे. परंतु, शासनस्तरावरून गावाच्या विकासाची दखल घेतली जात नाही. तेथील नामदेवराव हनवंतराव वानखेडे हे भूमिहीन असून, त्यांनासुद्धा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभाची प्रतीक्षा आहे.
बॉक्स
गावातील २५ कुटुंबे वंचित
२०११ च्या सर्वेक्षणानुसार २०१५ मध्ये गावातील ५६ लोकांची यादी प्राप्त झाली. त्यानंतर तालुकास्तरीय चौकशी समिती गावात आली. त्यांनी पात्र व अपात्र लाभार्थी ठरविले. ५६ पैकी ३६ पात्र, तर २० अपात्र ठरले. नंतर २०१५ ते २०२० या दरम्यान १३ घरे पूर्ण झाली. सध्या १९ घरे मंजूर आहे. उर्वरित तीन घरकुल प्रलंबित आहे. गावात भूमिहीन रोजमजुरी करणाऱ्या वंचित लाभार्थींची संख्या जवळजवळ २० ते २५ आहे. शासनस्तरावरून यासंदर्भात सकारात्मक विचार व्हावा, असे सरपंच ज्योती गणेश वानखेडे यांनी सांगितले.