डायनोसॉरची हाडे वापरून बांधली घरे! चुनखडक समजून वापर झाल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 12:24 PM2023-06-12T12:24:46+5:302023-06-12T12:26:17+5:30

६ कोटी वर्षांपूर्वीच्या शंख-शिपल्यांची जीवाश्मे

Houses built using dinosaur bones! Claims to have been used to understand limestone | डायनोसॉरची हाडे वापरून बांधली घरे! चुनखडक समजून वापर झाल्याचा दावा

डायनोसॉरची हाडे वापरून बांधली घरे! चुनखडक समजून वापर झाल्याचा दावा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, वणी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील वीरकुंड गावाजवळ सहा कोटी वर्षांपूर्वीच्या लेट क्रिटाशियस काळातील विशालकाय डायनोसॉर या प्राण्याचे जीवाश्म सापडल्याचा दावा पर्यावरण आणि भूशास्त्र संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे.

वणी तालुक्यातील बोर्डा-विरकुंड परिसरात निओप्रोटेरोझोईक या १५० कोटी वर्षांदरम्यानच्या काळातील पैनगंगा ग्रुपचा चुनखडक असून त्या काळात येथे समुद्र होता. जुरासिक काळात येथे विशालकाय डायनोसॉर प्राण्यांचा विकास झाला. परंतु, ६ कोटी वर्षांपूर्वी क्रिटाशिअस काळात ज्वालामुखीच्या प्रवाहात सर्व सजीव आणि डायनोसॉर मारले गेले. येथे बेसाल्ट या अग्निजन्य खडकाच्या रूपाने ते पुरावे आजही पाहायला मिळतात. परंतु,  अनेक ठिकाणी त्यांच्या हाडांचे जीवाश्मात रूपांतर झाल्यामुळे आज ते सापडत आहेत. वीरकुंड गावाजवळ ५० वर्षांपूर्वी डायनोसॉरचा अष्मीभूत सांगाडा असावा; परंतु लोकांनी जंगलात शेती करताना येथील चुनखडक घरे बांधण्यासाठी वापरला. हाडे आणि चुनखडक दुरून सारखाच दिसत असल्याने गावकऱ्यांनी डायनोसॉरची हाडेसुद्धा घरे बांधण्यासाठी वापरली. जीवाश्मांच्या आकार, प्रकार, स्थळ आणि  भूशास्त्र विभागातील तज्ज्ञांच्या मतानुसार  हे जीवाश्म डायनोसॉरचेच  आहे, असा विश्वास चोपणे यांनी व्यक्त केला.

६ कोटी वर्षांपूर्वीच्या शंख-शिपल्यांची जीवाश्मे

प्रा.चोपणे यांना दोन वर्षांपूर्वी डायनाेसॉरच्या पायाचे एक अष्मीभूत हाड सापडले होते. त्यांनी यापूर्वी पांढरकवडा, राळेगाव व झरी तालुक्यात ६ कोटी वर्षांपूर्वीच्या शंख-शिपल्यांची जीवाश्मे, तर १५० कोटी वर्षांपूर्वीची स्ट्रोमॅटोलाइटची जीवाश्मे शोधून काढली आहेत. यवतमाळ जिल्ह्यात २५ हजार वर्षांपूर्वीची पाषाणयुगीण अवजारेसुद्धा शोधली असून हे सर्व पुरावे त्यांच्या घरी व्यक्तीगत शैक्षणिक संग्रहालयात आहेत.

चंद्रपूरप्रमाणे वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरी, मुकुटबन हा परिसर जीवाश्मांच्या बाबतीत समृद्ध आहे. येथील जमीन आणि जंगली भागात डायनोसॉरचे जीवाष्म आढळू शकतात.  -प्रा सुरेश चोपणे, संशोधक  

Web Title: Houses built using dinosaur bones! Claims to have been used to understand limestone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.