पोलिसांचे गृहकर्ज अटींच्या जोखडात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 11:58 PM2018-10-02T23:58:47+5:302018-10-02T23:59:16+5:30
सेवा आणि शिस्तीचे खाते असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा संपूर्ण संसार मोडक्या वसाहतींमध्येच होतो. स्वत:च्या हक्काचे घर व्हावे यासाठी पोलिसांनी डीजी होम लोन दिले जाते.
सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सेवा आणि शिस्तीचे खाते असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा संपूर्ण संसार मोडक्या वसाहतींमध्येच होतो. स्वत:च्या हक्काचे घर व्हावे यासाठी पोलिसांनी डीजी होम लोन दिले जाते. मात्र मागील काही वर्षांपासून यातही अनेक जाचक अटी लादल्याने असे लोन घेणारेच पोलीस कर्मचारी आता अडचणीत सापडले आहे. जिल्ह्यातील दीडशेच्या जवळ कर्मचाऱ्यांना होम लोनमुळे दंडाची आकारणी करण्यात आली आहे.
डीजी होम लोन मिळविण्यासाठी दोन शासकीय नोकरीतील जमानतदार आवश्यक आहे. त्यांनी नुसती जमानत घेऊन चालत नाही तर त्या दोघांकडेही असलेल्या मालमत्तेची हैसियत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. याशिवाय अनेक अटी आहेत. जवळपास २० लाखापर्यंतचे कर्ज घर बांधणीसाठी दिले जाते. प्लॉट खरेदी व घर बांधकाम या दोन्हींची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी मिळतो. अनेकांनी मोठ्या हिंमतीने डीजी होम लोन घेतले. मात्र तीन महिन्याच्या अवधीत मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. काहींना अपेक्षित परिसरात घरच मिळाले नाही. आता असे कर्मचारी अटी-शर्तीचा भंग केल्यामुळे दंडात्मक कारवाईसाठी पात्र ठरले आहे.
कागदपत्रांची पूर्तता न केल्याने २.७५ टक्के दंड आकारला जात आहे. काहींकडून कर्जाची घेतलेली रक्कम परतफेड करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र यातही कर्जाची संपूर्ण रक्कम व्याजासह भरण्याची अट घातली आहे. त्यामुळे जवळ असलेली रक्कमही आता भरण्यासाठी दुसरे कर्ज काढण्याची वेळ आली आहे. बाबूगिरीचा ताप वाढत असून कायद्याच्या प्रत्येक बाबींचा बारिक-बारिक कीस पाडला जात आहे. काही जिल्ह्यांमध्ये घटक प्रमुखाच्या स्तरावरच डीजी लोनची प्रकरणे निकालात काढली जातात. येथे मात्र प्रत्येक बाबीसाठी वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन घेतले जात असल्याने अडचणी वाढतच आहेत.
आता आॅनलाईन अर्ज
होम लोनसाठी पोलिसांना संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून घटक प्रमुखाकडे जावे लागणार आहे. त्यानंतर घटक प्रमुखांच्या स्तरावरून हा अर्ज आॅनलाईन भरण्यात येईल. त्यानंतर मंजुरी मिळाल्यावर एचडीएफसी बँकेकडून होम लोन मिळणार आहे. यासाठी महापोलीस वेबसाईटवर एचबीए पोर्टल कार्यान्वित केले आहे.