शाळकरी मुलांच्या हाती ई-सिगारेट येतेच कशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 18:05 IST2025-02-28T18:03:44+5:302025-02-28T18:05:14+5:30
प्रशासनाला केव्हा येणार जाग : फॅशन साहित्याच्या दुकानातून विक्री

How do e-cigarettes come into the hands of school children?
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मानवी आरोग्याला घातक असलेली प्रतिबंधित ई-सिगारेट आता शहरातील शाळकरी मुलांच्या हाती पोहोचली आहे. राजरोसपणे या सिगारेटची विक्रीची केली जात आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात अशी सिगारेट विकणारे सक्रिय आहेत. त्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. नशेच्या आहारी जाऊन शाळकरी मुलांचे जीवन उद्ध्वस्त होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
१२ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांना व्यसनाच्या नादी लावण्याचे काम होत आहे. प्रतिबंधित असणारी ई-सिगारेट प्रचलित असल्याप्रमाणे विकली जात आहे. सहज उपलब्ध होत असल्याने शाळकरी मुले तिला बळी पडत आहेत. पालकांचे दुर्लक्षही यासाठी कारणीभूत ठरते. मुलगा कुठे जातो, काय करतो हे तपासले जात नाही. त्याच्या दप्तरात कुठल्या वस्तू असतात, याचीही झडती घेण्यात येत नाही. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत आहे.
नशा केलेली मुले आक्रमक
ई-सिगारेटची नशा केल्यानंतर मुले प्रचंड आक्रमक होतात. त्यांचे भावनांवर नियंत्रण राहत नाही. अशा मुलांपासून शाळेतील इतर मुलांनाही धोका होऊ शकतो.
पालकांनी राहावे सतर्क
मुलगा शाळा, ट्युशन यात व्यस्त असतो; तर पालक आपल्या दैनंदिन कामकाजात गुंतलेले असतात. मुलांसोबत त्यांचा पुरेसा संवाद होत नाही. मुले नेमकी काय करतात, कोणासोबत राहतात, याची माहिती नसते. पालकांनी जागरूक होऊन मुलांशी नियमित संवाद ठेवावा. त्याच्या शाळेतील, घराजवळच्या आणि ट्युशनमध्ये असणाऱ्या मित्रांची माहिती घ्यावी. जेणेकरून मुले व्यसनाला बळी पडणार नाही.
या ठिकाणी होत आहे विक्री
विदर्भ हाऊसिंग सोसायटीतील गोधनी रोड ते माईंदे चौक मार्गावर, दारव्हा मार्गावर एका शोरूमच्या बाजूला इ-सिगारेट सहज मिळते. दोन्ही दुकानांतून फॅशन साहित्य विकले जाते; तर धामणगाव मार्गावर शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरात हुक्का विकला जातो.
या अवयवांवर होतो परिणाम
इ-सिगारेटच्या सेवनामुळे शरीरातील फुप्फुस, हृदयाच्या पेशी आणि मूत्रपिंडावर परिणाम होतो. लहान मुलांना याचे व्यसन जडल्यास दुर्धर आजारांनी अगदी कमी वयात त्यांचे शरीर निकामी होऊ शकते.
२०० रुपये ते दोन हजारांपर्यंत ई-सिगारेट आहे
इ-सिगारेट बाजारात वेगवेगळ्या नावांनी उपलब्ध आहे. २०० रुपये ते दोन हजारांपर्यतची ही सिगारेट आहे. यातील लिक्विडच्या क्षमतेवरून तिची किंमत ठरते.
"इ-सिगारेट विक्री करणाऱ्यांची गोपनीय माहिती काढून त्यांच्याविरोधात मोहीम उघडण्यात येईल. प्रतिबंधित पदार्थ व वस्तू विकणाऱ्यांची गय केली जाणार नाही."
- कुमार चिंता, एसपी