गाव-तालुका यंत्रणा एवढी गाफिल कशी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 09:54 PM2017-10-03T21:54:26+5:302017-10-03T21:54:38+5:30
संपूर्ण जिल्ह्यात फवारणीतून विषबाधेचे रुग्ण उपचारार्थ दाखल होत असताना गाव आणि तालुकास्तरावरील कृषी, आरोग्य, महसूल व पोलीसची यंत्रणा एवढी गाफील कशी राहिली, .......
राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण जिल्ह्यात फवारणीतून विषबाधेचे रुग्ण उपचारार्थ दाखल होत असताना गाव आणि तालुकास्तरावरील कृषी, आरोग्य, महसूल व पोलीसची यंत्रणा एवढी गाफील कशी राहिली, असा सवाल राज्याचे प्रधान कृषी सचिव बिजयकुमार यांनी विचारला.
पिकावर फवारणी करताना विषबाधा होऊन जिल्ह्यात आतापर्यंत १८ शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला असून ८०० जण बाधित झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे प्रधान सचिव (कृषी) बिजयकुमार, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह (पुणे) सोमवारी जिल्ह्यात धडकले. यावेळी त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आणि शासनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयाला चांगलेच धारेवर धरले. तालुका स्तरावर कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, गाव स्तरावर कृषी सहायक आहेत. त्यांच्या सोबतीला समकक्ष आरोग्य, महसूल विभागाची यंत्रणा आहे. पोलिसांचीही गुप्तचर व खुफिया यंत्रणा कार्यरत आहेत. असे असताना यापैकी एकाही यंत्रणेने फवारणीतून विषबाधा होत असल्याबाबतचा ग्राऊंड रिपोर्ट जिल्हा कार्यालयाला सादर करू नये, याबाबत सचिवांनी आश्चर्य व्यक्त केले. जुलैपासून विषबाधेचे रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हाभरातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल होत होते. परंतु प्रत्यक्षात या विषबाधा बळी व रुग्णांची चर्चा २५ सप्टेंबरनंतर होऊ लागली. यावरून गाव व तालुकास्तरावरील कृषी, आरोग्य, महसूल, पोलीस यंत्रणा किती गाफिल व निष्क्रीय असल्याचे स्पष्ट होते. फवारणीतून होणाºया विषबाधेचे बळी व रुग्ण संख्या दडपण्याचा तर या यंत्रणेचा इरादा नव्हता ना, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. सचिवांनी एसएओ आणि एडीओ यांच्या एकूणच कारभारावर व त्यांच्या विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते.
कृषी राज्यमंत्री आज जिल्ह्यात
कीटकनाशक फवारणीमुळे शेतकºयांच्या झालेल्या मृत्यूची ‘विलंंबाने का होईना’ दखल घेऊन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बुधवारी जिल्ह्यात येत आहेत. ते रुग्णांच्या भेटी घेऊन शेतांची पाहणी करणार आहे. शिवाय आढावा बैठकही घेणार आहे. याशिवाय भाजपाचे भंडारा येथील खासदार नाना पटोले हेसुद्धा बुधवारी जिल्ह्यात येत आहे. तत्पूर्वी सोमवारी रात्री अचलपूरचे (जि. अमरावती) आमदार बच्चू कडू यांनीही जिल्ह्यात भेट दिली. शेतकºयांना मदत न दिल्यास थेट कृषी सचिवांच्या कार्यालयात फवारणीचा इशारा त्यांनी दिला होता.
अळ्यांच्या आक्रमणाने बियाणे कंपन्यांचे दावे फोल
अमूक वाण वापरल्यास त्यावर अळीचा प्रादूर्भाव होणार नाही, असा दावा काही बियाणे कंपन्या करतात. बियाण्याच्या पिशवीवरही तसा उल्लेख स्पष्टपणे राहतो. त्यानंतरही पिकावर अळ्यांचे आक्रमण होत असेल तर कृषी विभागाची यंत्रणा गप्प कशी ? असा प्रश्न सचिवांनी विचारला. कृषी अधिकाºयांनी संबंधितांना किमान नोटीस तरी बजावली का ?, असा सवाल उपस्थित केला. विषबाधा प्रकरणाने बियाणे कंपन्यांचे तमाम दावे फोल ठरले. या कंपन्या अक्षरशा उघड्या पडल्या. त्यांच्या बियाण्यांच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह लागले. अशाच पद्धतीने मोठमोठे दावे करून या बियाणे कंपन्या गेल्या अनेक वर्षांपासून शेतकºयांची लूट करीत असल्याचे दिसून येते. आता कृषी सचिव आणि आयुक्तालय स्तरावरून अशा बियाणे कंपन्यांवर नेमकी काय कारवाई होते, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.
किटकनाशके सदोष तर नाही ? सचिवांची शंका
कृषी विभागाने जिल्ह्यात कृषी केंद्रांना कीटकनाशके विक्रीचा परवाना दिला आहे. परंतु त्या परवान्याआड या केंद्रांमधून वेगळेच औषध विकले तर जात नाही ना, अशी शंका कृषी सचिव व आयुक्तांनी बोलून दाखविली. परवानाधारक नेमके काय विकतो हे तपासण्याची जबाबदारी कृषीच्या यंत्रणेची नाही का, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
‘पीकेव्ही’चे कुलगुरू, संचालक आहेत कुठे ?
फवारणीमुळे होणारे मृत्यू राज्यभर गाजत असताना अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (पीकेव्ही) उच्च पदस्थ अधिकारी मात्र अद्यापही यवतमाळकडे फिरकलेले नाही. वास्तविक आतापर्यंत पीकेव्हीचे कुलगुरू डॉ. विलास भाले, कीटकशास्त्र संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर यांच्या येथे भेटी अपेक्षित होत्या. मात्र पीकेव्हीचे उच्च पदस्थ अद्यापही विभाग प्रमुख व स्थानिक यंत्रणेवरच अवलंबून असल्याचे दिसते.
रक्त चाचणी का नाही?
जिल्ह्यात फवारणीतून झालेल्या विषबाधेच्या कोणत्याही रुग्णाच्या रक्त नमुन्याची अद्याप रासायनिक चाचणी करण्यात आलेली नाही. त्याबाबत कृषी विभागानेसुद्धा मागणी केल्याची नोंद नाही. ही चाचणी झाली असती तर कीटकनाशकातील नेमका कोणता घटक शरीरात भिनला याचे निदान लावणे व वापरलेल्या कीटकनाशकाच्या नमुन्यातील रासायनिक घटकांची पडताळणी करणे सहज शक्य झाले असते.