शिक्षकच नाही तर शिकायचे कसे? विद्यार्थी धडकले सीईओंपुढे
By अविनाश साबापुरे | Published: July 17, 2023 09:06 PM2023-07-17T21:06:12+5:302023-07-17T21:07:37+5:30
मार्कीच्या मुलांनी जिल्हा परिषदेत दिली धडक
अविनाश साबापुरे, यवतमाळ: जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा पडला आहे. झरी तालुक्यातील मार्की बुद्रूक या गावातील शाळेत तर सध्या एकही शिक्षक नाही. त्यामुळे सोमवारी संतप्त पालकांसह विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेत धडक देत वर्ग भरविला. आम्हाला शिक्षक द्या, अशी मागणी करीत या विद्यार्थ्यांनी सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यापुढे ठिय्या दिला.
झरी तालुक्यातील अनेक शाळांवर गेल्या तीन चार वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अन्याय होत आहे. अनेक शिक्षक या तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये जाण्यासाठी तयार नाहीत. मार्की बुद्रूक येथे मागील सत्रात पाच शिक्षक होते. परंतु आता पाचही शिक्षकांच्या बदलीमुळे तेथे एकही शिक्षक नाही. तालुक्यातील अनेक शाळेतील शिक्षकांच्या बदलीमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. मार्की बुद्रूक येथील शाळा सध्या विनाशिक्षक बनली आहे. बदली प्रक्रिया राबविण्यापूर्वी या शाळेसाठी शिक्षकांची व्यवस्था करायला हवी होती, अशी मागणी यावेळी पालकांनी केली. येथील शिक्षकांच्या बदल्या केल्या, परंतु बदली झालेल्या शिक्षकांच्या जागेवर नवे शिक्षक देण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना घेऊन थेट यवतमाळ येथे जिल्हा परिषदेत धडक दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या दालनाबाहेर विद्यार्थ्यांचा वर्ग भरविण्यात आला. त्यानंतर पालकांसोबत सीईओंनी चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. परंतु, बदली प्रक्रियेत असा घोळ घालण्यासाठी जबाबदार कोण, त्यांच्यावर कारवाई कोण करणार, असा सवाल यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी उपस्थित केला.