शिक्षणाचा डोलारा कसा पेलणार? शिक्षण खात्यात ३ वर्षांपासून १७ पैकी एकही सहसंचालक नाही
By अविनाश साबापुरे | Published: June 15, 2024 10:32 AM2024-06-15T10:32:23+5:302024-06-15T10:33:08+5:30
Education News: तीन वर्षांपासून शालेय शिक्षण खात्यात १७ पैकी एकही सहसंचालक नाही. त्यामुळे अनेक उपक्रमांवर विपरीत परिणाम होत आहे. नव्या सत्राच्या शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे आता तरी पदे भरावी, अशी मागणी होत आहे.
- अविनाश साबापुरे
यवतमाळ : तीन वर्षांपासून शालेय शिक्षण खात्यात १७ पैकी एकही सहसंचालक नाही. त्यामुळे अनेक उपक्रमांवर विपरीत परिणाम होत आहे. नव्या सत्राच्या शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे आता तरी पदे भरावी, अशी मागणी होत आहे. शिक्षण सचिव, आयुक्त, संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी अशा क्रमाने शिक्षण क्षेत्राचा कारभार चालतो. त्यातील प्रत्येक टप्प्यावरील कामांच्या नियोजनासाठी राज्यस्तरावर शिक्षण सहसंचालक हे पद अतिशय महत्त्वाचे आहे.
आतातरी पदे भरणार का?
१७ पदे पदोन्नतीने भरण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रक्रिया सुरू झाली. सहसंचालक म्हणून बढतीसाठी पात्र अधिकाऱ्याऱ्यांची यादी सहा महिन्यांपूर्वी पदोन्नती समितीपुढे ठेवण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाच्या समितीने या यादीला मान्यताही दिली. परंतु, आता संबंधित अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्याकडे कानाडोळा होत आहे.
पात्र अधिकारीच मिळत नव्हते !
सहसंचालक पदासाठी आवश्यक तीन वर्षे कामगिरीची पात्रता असणारे अधिकारीच मिळत नव्हते. त्यामुळे पदोन्नती प्रक्रियाही रखडली होती, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याऱ्यांनी सांगितले. परंतु, आता पात्र अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची फाइल तयार असूनही मंत्रालयात धूळखात पडली आहे.
कामांवर विपरित परिणाम शिक्षण सहसंचालकांकडे शिक्षकांचे शालार्थ आयडी, परीक्षासंदर्भातील कामे, शैक्षणिक योजनांचे आराखडे तयार करण्याची जबाबदारी अशी विविध महत्त्वाची कामे असतात.