पुसदमध्ये बंजारा बांधवांचा विराट महाआक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 05:00 AM2021-12-18T05:00:00+5:302021-12-18T05:00:34+5:30

पुसद, काळी दौ.सह लगतच्या तालुक्यातील समाजबांधवांनी शुक्रवारच्या मोर्चात सहभाग घेतला. अनेक समाजबांधव वाहने आणि पायदळ येथील वसंत उद्यान परिसरात पोहोचले. तेथून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, डॉ. आंबेडकर चौक, मुखरे चौक, यशवंत रंगमंदिर मैदानमार्गे मोर्चा दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. तेथे त्यांना अभिवादन करण्यात आले.

Huge outcry of Banjara brothers in Pusad | पुसदमध्ये बंजारा बांधवांचा विराट महाआक्रोश

पुसदमध्ये बंजारा बांधवांचा विराट महाआक्रोश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : महागाव तालुक्यातील काळी (दौ.) येथील श्याम राठोड या युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी गोर सेनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी बंजारा समाजबांधवांनी महाआक्रोश मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविले. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाला झुगारुन हा विराट मोर्चा निघाला. 
पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळी (दौ.) येथे ३ डिसेंबर रोजी दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून काही युवकांनी श्याम शेषराव राठोड याचा खून केला होता. यानंतर काळी येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे १५ दिवसांपासून पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी तेथे ठिय्या मांडून होते.   
पुसद, काळी दौ.सह लगतच्या तालुक्यातील समाजबांधवांनी शुक्रवारच्या मोर्चात सहभाग घेतला. अनेक समाजबांधव वाहने आणि पायदळ येथील वसंत उद्यान परिसरात पोहोचले. तेथून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, डॉ. आंबेडकर चौक, मुखरे चौक, यशवंत रंगमंदिर मैदानमार्गे मोर्चा दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. तेथे त्यांना अभिवादन करण्यात आले. नंतर गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, प्रवक्ते प्रफुल्ल जाधव यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या मोर्चातील गर्दी बघून उपविभागीय अधिकारी सावन कुमार यांनी वसंतराव नाईक चौकात येऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी एका महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा इशारा 
दिला. 

शहराला आले पोलीस छावणीचे स्वरूप
- जमावबंदी आदेशानंतरही मोर्चा निघाल्याने शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. तब्बल १२ डीवायएसपी, ५७ पोलीस निरीक्षक आणि दीड  हजार पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात होता. याशिवाय पुसद उपविभागातील डीवायएसपी, पोलीस निरीक्षक, सर्व ठाणेदार व पोलीसही तैनात होते. शहराच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली होती. मोर्चात सहभागी होण्यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच अनेकांनी पुसदकडे प्रयाण केले होते. मात्र, नाकाबंदीच्या दरम्यान जवळपास दीड हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. गुरुवारी रात्रीही पोलिसांनी जवळपास ३५० जणांना स्थानबद्ध केले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला झुगारले
- जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश दिले होते. हे आदेश झुगारून मोर्चा निघाला. बंदोबस्तासाठी जवळपास ३०० पोलीस अधिकारी बोलाविण्यात आले होते. एसआरपीएफच्या तीन कंपन्या, शेजारील जिल्ह्यातूनही पोलीस कुमक मागविण्यात आली होती. विशेष म्हणजे, थेट राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने  अतिरिक्त बंदोबस्त पुरविला होता. बीड, अमरावती, औरंगाबाद, वर्धा, हिंगोली येथूनही जादा तुकड्या मागविण्यात आल्या होत्या.

आमदारांना पाठवले आल्या पावली परत 
- दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यावेळी आमदार इंद्रनील नाईक मोर्चात सहभागी होऊन सभास्थळी मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. मात्र, मोर्चेकऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत त्यांना आल्या पावली परत पाठवले.

मोर्चेकऱ्यांनी निवेदनातून केलेल्या मागण्या 
- आरोपींना फाशीची तर सह आरोपींना जन्मठेपेची शिक्षा द्यावी. हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा, खटला चालविण्यासाठी निष्णांत सरकारी वकिलाची नेमणूक करावी, पीडित कुटुंबाला तत्काळ २५ लाखांची मदत द्यावी, कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी. भटक्या जमाती समूदायाला ॲट्रोसिटी संरक्षण देण्यासाठी कायद्यात स्वतंत्र तरतूद करावी, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

 

Web Title: Huge outcry of Banjara brothers in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.