नेर, यवतमाळला झोडपले; निळोणा तुडुंब, बेंबळाचेही दरवाजे उघडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 12:42 PM2023-07-13T12:42:14+5:302023-07-13T12:44:01+5:30
नेरमध्ये १०९ तर यवतमाळ तालुक्यात ६३ मिमी पाऊस : बाभूळगावसह कळंब, दारव्हा तालुक्यातही जोर
यवतमाळ : महिनाभराच्या विलंबाने जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असले, तरी मागील काही दिवसांत पावसाने दमदार बॅटिंग केल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांत पाणीसाठा वाढत आहे. निळोणा धरण भरल्यानंतर आता बेंबळा प्रकल्पातही पाण्याची आवक वाढल्याने गुरुवारी (दि. १३) सकाळी १० वाजता या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
दरम्यान, यवतमाळसह नेर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले असून नेरमध्ये अतिवृष्टी झाली असून, तेथे १०० मिमी पाऊस कोसळला आहे. जून महिन्यात पावसाने निराशा केली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच धास्तावला होता. मात्र, जुलैमध्ये पावसाने जोर धरल्याने बळीराजा पेरणीला लागला आहे.
जिल्ह्यातील साधारण: ७५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या उरकल्या आहेत. मंगळवारी यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. विशेषत: संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. अनेक भागांत रात्रभर रिमझिम पाऊस बरसत होता. बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक १०० मिमी पाऊस नेर तालुक्यात झाला असून, त्यापाठोपाठ ६३.५ मिमी पावसाची नोंद यवतमाळ तालुक्यात झाली आहे. बाभूळगाव, कळंब, दारव्हासह मारेगाव तालुक्यातही दमदार पाऊस झाला.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
हवामान विभागाने जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे. बुधवारप्रमाणेच गुरुवारी, तसेच शुक्रवारीही जिल्ह्यात पाऊस मुक्कामी राहण्याची शक्यता आहे. विविध ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे बेंबळा प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गुरुवारी, दि. १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता या प्रकल्पाचे दोन वक्र दरवाजे उघडून २५ सेमी इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे. त्यामुळे बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, वणीसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाने निकृष्ट रस्त्याचे पितळ पाडले उघडे
जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये पावसाला सुरुवात झाली. त्यातही मागील दोन-तीन दिवसांपासून यवतमाळसह जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यात बुधवारी सकाळपर्यंत ३३३.७ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली असून, एकूण पावसाच्या ती २४.६ टक्के इतकी आहे; मात्र या पावसात यवतमाळसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे पितळ उघडे पडले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, या खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनचालकांना कमालीचा मनस्ताप सोसावा लागत आहे.