दाभडीच्या जंगलात आढळल्या मानवी अस्थी; तालुक्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 03:15 PM2023-03-10T15:15:12+5:302023-03-10T15:15:58+5:30

वर्षभरापूर्वी गायब झालेल्या अल्पवयीन प्रेमी युगुलाचे गूढ कायम

human bones found in Dabhadi forest of yavatmal | दाभडीच्या जंगलात आढळल्या मानवी अस्थी; तालुक्यात खळबळ

दाभडीच्या जंगलात आढळल्या मानवी अस्थी; तालुक्यात खळबळ

googlenewsNext

आर्णी (यवतमाळ) : तालुक्यातील दाभडी येथील एक अल्पवयीन प्रेमियुगुल वर्षभरापूर्वी पळून गेले होते. त्यांचा अद्याप थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, गुरुवारी गावालगतच्या जंगलात मानवी अस्थी, केस, मुलाचे व मुलीचे कपडे व इतर वस्तू आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

वर्षभरापूर्वी दाभडी येथून एक अल्पवयीन प्रेमीयुगुल गायब झाले होते. याप्रकरणी मुलीच्या आईने १७ फेब्रुवारी २०२२ रोजी पोलिसांत मुलगी घरून गेल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. वर्षभर पोलिस या प्रकरणाचा तपास करीत होते. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागला नाही. याच प्रकरणात संशयित मुलाचे वडील व भावाला पोलिसांनी अटक केली होती. ते दोघेही अडीच महिने तुरुंगात होते. तरीसुद्धा मुलाचा व मुलीचा शोध लागला नाही.

आता एक वर्षानंतर ८ मार्च २०२३ रोजी दाभडी शिवारालगतच्या जंगलात गायब असलेल्या मुलाचा अचानक मोबाइल आढळला. गावातील युवक जनार्दन कांबळे जंगलात मध आणण्यासाठी गेला असता त्याला तो मिळाला. मोबाइल गायब असलेल्या मुलाचाच असल्याची खात्री त्याच्या भावाने केल्यानंतर गुरुवारी सकाळी ग्रामस्थ व पोलिस जंगलात गेले. तेथे गायब असलेल्या मुलाचे व मुलीचे कपडे कुजलेल्या अवस्थेत आढळले. ते कपडे त्यांचेच असल्याचे नातेवाइकांनी ओळखले.

घटनास्थळी पोलिसांना अस्थींचे तुकडे, केस, दातही आढळले. परंतु, नेमके ते कुणाचे, हे गूढ कायम आहे. जवळच स्मशानभूमी आहे. अरुणावती धरणाच्या पाटसऱ्याही आहेत. त्यामुळे पाण्यातसुद्धा काही वाहून येऊ शकते, असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी सर्वच वस्तू केल्या जप्त

पोलिसांनी गुरुवारी घटनास्थळावरून सर्वच वस्तू जप्त केल्या. त्या पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठविल्या आहेत. मात्र, एक वर्षानंतर अचानक वस्तू सापडल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर, ठाणेदार श्याम सोनट्टके, सहायक पोलिस निरीक्षक गणपत काळुसे, गजानन अजमिरे यांच्यासह जमादार सतीश चवदार, देवानंद मुनेश्वर, मिथुन जाधव, मनोज चव्हाण, मंगेश जगताप आदींनी पाहणी केली.

दाभडी येथील जंगलात ज्या वस्तू मिळाल्या, त्यावरून निश्चित काहीच सांगता येत नाही. पोलिस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर काही बाबी स्पष्ट होतील.

- श्याम सोनट्टके, ठाणेदार, आर्णी.

Web Title: human bones found in Dabhadi forest of yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.