सिलिंडर स्फोटात दीड लाख जळाले
By admin | Published: May 24, 2017 12:26 AM2017-05-24T00:26:10+5:302017-05-24T00:26:10+5:30
शेतातील घरात सिलिंडरचा स्फोट होवून महागड्या वस्तूंचे नुकसान झाले. तसेच दीड लाख रुपयांच्या नोटा जळाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाढोणाबाजार : शेतातील घरात सिलिंडरचा स्फोट होवून महागड्या वस्तूंचे नुकसान झाले. तसेच दीड लाख रुपयांच्या नोटा जळाल्या. ही घटना सोमवारी रात्री ११ वाजता वाढोणाबाजार येथे घडली. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.
वाढोणाबाजार येथील परेश देशमुख यांची शेती आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांनी कसण्यासाठी घेतली आहे. यासाठी त्यांनी शेतातच टीनाचे घर उभारले आहे. पुल्लया नरसिंहम पुनाटी हे सहपरिवार तेथे राहतात. सोमवारी रात्रीचे जेवण घेवून हे सर्व कुटुंब घराबाहेर येवून बसले. तेवढ्यातच त्यांच्या घरातील सिलिंडरने अचानक पेट घेतला.
ही बाब लक्षात येताच कुटुंबातील सर्व सदस्य शेतातच थोड्या अंतरावर सुरक्षित स्थळी येवून थांबले. काही वेळाने सिलिंडरचा स्फोट झाला. या आवाजाने गावकरी मदतीसाठी धावले. मात्र तोपर्यंत घरातील सात क्विंटल तुरी, फ्रीज, कुलर आणि वापरातील वस्तूंचे नुकसान झाले. दीड लाख रुपयांची रोकडही या घटनेत जळाल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.