भक्तांसाठी अहोरात्र झटतात शेकडो हात

By admin | Published: October 16, 2015 02:23 AM2015-10-16T02:23:03+5:302015-10-16T02:23:03+5:30

यवतमाळचा दुर्गोत्सव हा वैभवी दुर्गोत्सव म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील खेड्यापाड्यांतून भाविक यवतमाळात दर्शनासाठी येतात.

Hundreds of hands are waiting for devotees all day long | भक्तांसाठी अहोरात्र झटतात शेकडो हात

भक्तांसाठी अहोरात्र झटतात शेकडो हात

Next

यवतमाळ : यवतमाळचा दुर्गोत्सव हा वैभवी दुर्गोत्सव म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील खेड्यापाड्यांतून भाविक यवतमाळात दर्शनासाठी येतात. यातील बरेच भक्त अनवाणी असतात. तर अनेकांचा निरंकाळ उपवास असतो. काही भक्त देवीच्या दर्शनानंतरच उपवास सोडतात. बाहेरगावावरून येणाऱ्या भक्तांच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी दुर्गोत्सव मंडळांनी पुढाकार घेतला आहे. यातूनच दररोज शेकडो हात अखंड झटताहेत. काही मंडळे अन्नदान करीत आहेत. काही भक्तगण उपवासाच्या साहित्याचे वितरण करीत आहे. अनेक भक्त मंडळांनी दुधाचे वितरण करण्याचे काम हाती घेतले आहे. यातून अन्नदानाचा अखंड यज्ञ सुरू आहे.
यावर्षीच्या दुर्गोत्सवाचे विशेष वैशिष्ट आहे. प्रत्येक मंडळाने भक्तांसाठी अन्नदानाची व्यवस्था केली आहे. शहरातील कुठल्याही भागात पोहोचले तरी अहोरात्र अन्नदान करण्यात येत आहे. जिल्हाभरातच दुर्गोत्सवातील हे दानधर्म मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कित्येक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पदरमोड करून त्यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्नदान, दूधवाटप केले जात आहे. यानिमित्ताने गावखेड्यातील भाविकांना देवीचा महाप्रसाद मिळत आहे. भोळ््याभाबड्या भाविकांच्या चेहऱ्यावर त्याचे वेगळे समाधानही झळकत आहे. जिल्ह्याच्या १६ ही तालुक्यात यवतमाळ प्रमाणेच दुर्गोत्सवाचा प्रचंड उत्साह असतो. त्यातल्या दानधर्मालाही वेगळे महत्व आहे.
यवतमाळच्या गांधी चौक दुर्गोत्सव मंडळाने भक्तांचा निरंकाळ उपवास लक्षात घेत दूध वितरणाची आपली अखंड परंपरा जपली आहे. यासाठी दररोज ५०० लिटर दूध वितरित करण्यात येत आहे. दुधाला तापविण्यासाठी सकाळपासूनच प्रक्रिया केली जाते. दूध वितरणासाठी १० हजार ग्लास बोलविण्यात आले आहेत.
शहरातील माळीपुरा परिसरात असलेल्या नवशक्ती दुर्गोत्सव मंडळाचे ४४ वे वर्ष आहे. या मंडळाने गत १५ वर्षांपासून अन्नदानाचे कार्य हाती घेतले आहे. सर्वाधिक अन्नदान करणारे मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे. या ठिकाणी दर्शनाकरिता येणाऱ्या भक्तांच्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते. यासाठी १६ तास काम चालते. भोजनाची व्यवस्था करण्यासाठी दोन शिफ्टमध्ये कारागीर अखंडपणे काम करीत असतात. या ठिकाणी दररोज १५ भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. यासाठी दररोज सहा क्विंटल कणिक लागते. एक क्विंटलची जिलेबी, पाच क्विंटल तांदूळ, सात क्विंटल भाजी, ५०० लिटर दूध दररोज लागत आहे. यासाठी ५० स्वयंपाकी अहोरात्र झटत आहे. यासोबतच मंडळाचे कार्यकर्ते संपूर्ण प्रक्रिया राबविण्यासाठी काम करीत आहेत.
बालाजी चौकातील बालाजी चौक दुर्गोेत्सव मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या मंडळाने अखंड अन्नदानाची परंपरा कायम ठेवली आहे. या ठिकाणी सरासरी पाच हजारांवर भाविकांसाठी अन्नदान करण्यात येते. दररोज चार क्विंटल गहू, १ क्विंटल तांदूळ, अडीच क्विंटलची भाजी आणि गोड पदार्थ रोज भोजनात असतात. या ठिकाणी अन्नदानासाठी सरासरी २५ सेवेकरी अहोरात्र झटत आहेत.
आठवडी बाजारातील हिंदुस्थानी दुर्गोत्सव मंडळाचे ७७ वे वर्ष आहे. शहरातील भाविक महिला मध्यरात्रीपासून शितला मातेला जल अर्पण करतात. रात्रभर या भागात वर्दळ सुरू असते. दर्शनासाठी येणाऱ्या महिला भक्तांसाठी दूध आणि उपवासाचे साहित्य वितरित करण्यात येत आहे. साधारणत: ५०० लिटर दूध वितरित करण्यात येते.
छोटी गुजरी चौकातील एकता दुर्गोत्सव मंडळाचे ४६ वे वर्ष आहे. या मंडळाने दर्शनासाठी येणाऱ्या भक्ताकरिता उपवास साहित्य वितरित करण्याचे काम हाती घेतले आहे. नऊ दिवस या ठिकाणी उपवासाचे साहित्य वितरित करण्यात येत आहे.
आर्णी नाक्यावरील जय माता दी मित्र परिवार मंडळाने दर्शनासाठी येणाऱ्या मंडळासाठी दूध वितरणाचे काम हाती घेतले आहे. या ठिकाणी दररोज ५०० लिटर दूध वितरित करण्यात येत आहे. परिसरातील व्यापाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती राजू बंडेवार, सुनिल अग्रवाल, अतुल मुक्कावार आदींनी दिली. (शहर वार्ताहर)

Web Title: Hundreds of hands are waiting for devotees all day long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.