पूरग्रस्तांसाठी सरसावले शेकडो हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 09:45 PM2019-08-13T21:45:37+5:302019-08-13T21:46:25+5:30
कोल्हापूर, सांगलीत पुरामुळे भीषण संकट निर्माण झाले आहे. तेथे मदत पाठविण्यासाठी यवतमाळातील नागरिकही सरसावले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणावरून मदत केंद्राकडे मदत येत आहे. मदतीचा पहिला ट्रक मंगळवारी कोल्हापूर आणि सांगलीकडे रवाना झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोल्हापूर, सांगलीत पुरामुळे भीषण संकट निर्माण झाले आहे. तेथे मदत पाठविण्यासाठी यवतमाळातील नागरिकही सरसावले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणावरून मदत केंद्राकडे मदत येत आहे. मदतीचा पहिला ट्रक मंगळवारी कोल्हापूर आणि सांगलीकडे रवाना झाला. यामध्ये एक लाख रूपयांची रोख मदत, धान्य, कपडे हे साहित्य पाठविण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी ललित वºहाडे यांच्या उपस्थितीत हे पथक रवाना झाले.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाजकार्य महाविद्यालयाने काही निधी आणि दैनंदिन गरजेचे साहित्य गोळा केले. एक लाख रूपयांचा निधी आणि धान्य घेऊन समाजकार्य महाविद्यालयाची चमू मंगळवारी रवाना झाली. यामध्ये ९० विद्यार्थी सहभागी झाले. तांदूळ, डाळ, साखर, कपडे, चादर, ब्लँकेट, चिवडा, बिस्कीट, औषधी, सॅनेटरी नॅपकीन, कपडे, चप्पल या वस्तू पाठविण्यात आल्या आहेत. या कामात विविध संघटना, दानशूर व्यक्ती, डॉक्टरांनी मदत केली.
स्थानिक जिल्हा प्रशासनाने या चमूला पत्र देऊन जाण्याची परवानगी बहाल केली. तत्पूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी ललित वºहाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोलते, यवतमाळचे तहसीलदार शैलेश काळे, नैसर्गिक आपत्ती विभागाचे प्रमुख सतीश मून, प्राचार्य अविनाश शिर्के, प्रा. घनशाम दरणे, डॉ. प्रशांत चक्करवार, डॉ. विजय कावलकर उपस्थित होते.