यवतमाळात पेट्रोल शंभरी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 09:37 PM2021-05-25T21:37:41+5:302021-05-25T21:38:09+5:30
Yawatmal news प्रशासनाने एकीकडे कोरोनाचा स्कोअर कमी केलेला असताना शासनाने मात्र पेट्रोल दरवाढीचा स्कोअर शंभरीच्या पलीकडे नेला आहे. त्यामुळे कोरोनाच्या निर्बंधांनी आधीच जेरीस आलेल्या नागरिकांना पेट्रोल दरवाढीमुळे दुहेरी त्रास भोगावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रशासनाने एकीकडे कोरोनाचा स्कोअर कमी केलेला असताना शासनाने मात्र पेट्रोल दरवाढीचा स्कोअर शंभरीच्या पलीकडे नेला आहे. त्यामुळे कोरोनाच्या निर्बंधांनी आधीच जेरीस आलेल्या नागरिकांना पेट्रोल दरवाढीमुळे दुहेरी त्रास भोगावा लागत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून यवतमाळात पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी पेट्रोलने शंभरी गाठलेली असताना मंगळवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर १००.९९ इतका नोंदविला गेला. तर पाॅवर पेट्रोलचे दर १०१.२९ रुपये इतके नोंदविले गेले.
कोरोनामुळे शहरात गेल्या वर्षभरापासून बाजारपेठ मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेली आहे. हीच स्थिती जिल्हाभरात आहे. अनेक महिने घरातच लाॅकडाऊन असल्याने पेट्रोलच्या दरवाढीच्या झळा अनेकांना जाणवल्याही नाही. मात्र ही दरवाढ ९८ ते ९९ रुपयांपर्यंत येऊन थांबली होती. यादरम्यान केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचाही अर्थसंकल्प सादर झाला. परंतु, दोन्ही सरकारांनी पेट्रोलवरील कोणतेही कर कमी करण्याची भूमिका न घेता ही जबाबदारी एकमेकांवर लोटली. यात काही दिवस पेट्रोल ९९ रुपयांवरच अडखळे; परंतु गेल्या आठ दिवसांपासून दररोज दरवाढ नोंदविली जात असून, मंगळवारी चक्क १०१ रुपयांचा दरफलक झळकला. त्यामुळे वाहनधारकांची पाचावर धारण बसली.
पेट्रोलच्या दरवाढीमुळे बाजारपेठेतील अन्य वस्तूंचीही महागाई वाढण्याची दाट शक्यता आहे. कोरोना संकटात अनेकांचे रोजगार गेले, तर अनेकांची कमाई अर्ध्यावर आली आहे. अशावेळी किराणा, तेल, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आधीच वाढलेल्या आहेत. त्यात पेट्रोलच्या दरवाढीने भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत.