यवतमाळ शहरात शंभरावर वाहनांची चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 05:00 AM2021-06-23T05:00:00+5:302021-06-23T05:00:17+5:30
दुचाकी चाेरीमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यांचा साेईस्करपणे वापर करून घेतला जाताे. यवतमाळ शहरातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर हा चाेरट्याचे आवडते ठिकाण आहे. येथे अनेक दुचाकी एकाच वेळी उभ्या असतात. गाडी मालकावर पाळत ठेवून चाेरटे दुचाकी लंपास करत आहेत. दुचाकी चाेरीची तक्रार देण्यास पाेलीस ठाण्यात पाेहाेचलेल्या व्यक्तीलाच दुचाकी इतरत्र शाेधण्याचा सल्ला दिला जाताे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरसह जिल्ह्यात दुचाकी चाेरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. महिनाभरात शंभरावर वाहने चाेरीला गेली आहेत. यवतमाळात दर दिवशी पाच ते सहा वाहने चाेरीला जात आहेत. पाेलीस केवळ तक्रारी नाेंदविण्यापुरतीच भूमिका वठवत आहेत. दुचाकी चाेरीची तक्रार थेट दाखल करून घेतली जात नाही, त्यामुळे दर दिवशीचे प्रमाण रेकाॅर्डवर कमी दिसत आहे. चाेरटे सैराट झाल्याने सामान्य नागरिक हैराण आहेत.
दुचाकी चाेरीमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यांचा साेईस्करपणे वापर करून घेतला जाताे. यवतमाळ शहरातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर हा चाेरट्याचे आवडते ठिकाण आहे. येथे अनेक दुचाकी एकाच वेळी उभ्या असतात. गाडी मालकावर पाळत ठेवून चाेरटे दुचाकी लंपास करत आहेत. दुचाकी चाेरीची तक्रार देण्यास पाेलीस ठाण्यात पाेहाेचलेल्या व्यक्तीलाच दुचाकी इतरत्र शाेधण्याचा सल्ला दिला जाताे. दुचाकी सापडल्यास ती तक्रार नाेंदविल्यावर सहज परत करता येत नाही, असे सांगून परत पाठविले जाते. दुचाकी गेल्याचे दु:ख घेऊन त्या व्यक्तीलाच स्वत:च्या गाडीचा शाेध घ्यावा लागताे. शाेधाशाेध करून ती सापडत नाही. मात्र, पाेलीस ठाण्यातील हा अनुभव आल्यानंतर बरेच जण पुन्हा तक्रार देण्यासाठी जात नाही, त्यामुळे अनेक गुन्हे रेकाॅर्डवर येत नाहीत.
शहरासह ग्रामीण भागातही दुचाकी चाेरटे सक्रिय आहे. महगाव, उमरखेड, पुसद, आर्णी या तालुक्यातील गावांमध्ये दुचाकी चाेरीचे गुन्हे घडत आहे. अनलाॅकच्या प्रक्रियेत गुन्ह्याचा आलेख वाढणार, ही शक्यता अनेक जाणकारांनी वर्तविली हाेती. आता याची प्रचिती येत आहे. चाेरीच्या दुचाकीचा वापर हा विविध गुन्ह्यांमध्ये केला जाताे, अशा घटनाही घडत आहेत.
चाेरट्यांना माेकळे रान
- यवतमाळ शहरातील शहर पाेलीस ठाणे, अवधूतवाडी पाेलीस ठाणे, ग्रामीण व लाेहरा पाेलीस ठाण्यातही चाेरीचे गुन्हे दाखल हाेत आहे. दुचाकी चाेरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी काेणतीच ठाेस उपाययाेजना पाेलिसांकडून प्रभावीपणे राबविली जात नाही. यामुळेच चाेरट्यांचे फावत आहे. अनेक प्रमुख चाैकात असलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंद आहे. या कारणाने अनेक घटना उघडकीस येत नाही. किमान सीसीटीव्ही सुरू असल्यास चाेरट्यांच्या टाेळीचा झडा लागण्याला मदत हाेईल, असे जाणकार पाेलीस कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे.