शेकडो वाहने वणी पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:19 PM2018-08-23T22:19:29+5:302018-08-23T22:20:19+5:30
शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी गुरूवारी येथील वाहतूक विभागाने शहरात अचानक कारवाईची धडक माहीम राबविली खरी; मात्र या कारवाईने दुचाकीधारकांची चांगलीच दाणादाण उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी गुरूवारी येथील वाहतूक विभागाने शहरात अचानक कारवाईची धडक माहीम राबविली खरी; मात्र या कारवाईने दुचाकीधारकांची चांगलीच दाणादाण उडाली. या कारवाईसाठी खास यवतमाळवरून टोइंग वाहन बोलविण्यात आले. याद्वारे शेकडो वाहने उचलून ठाण्यात लावण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक पोलिसांकडून या वाहनधारकांविरुद्ध कारवाई केली जात होती.
शहरात वाहतुकीची शिस्त नसल्याने सवईप्रमाणे गुरूवारी नागरिक वाट्टेल त्या ठिकाणी वाहन उभे करून आपापली कामे करीत असताना वाहतूक पोलिसांचा ताफा टोइंग वाहनासह रस्त्यावर उतरला. रस्त्याच्या कडेल जे वाहन दिसेल ते टोइंग वाहनात उचलून ठेवण्याचा धडाका सुरू होताच, नागरिकांची चांगलीच ताराबंळ उडाली. सायंकाळपर्यंत वणीच्या वाहतूक शाखेत शेकडो दुचाकी वाहने जमा झाली होती. प्रत्येक दुचाकी धारकाला दंड आकारून नंतर सोडून देण्यात येत होते. वणी शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयापुढे अगदी रस्त्याच्या कडेला विद्यार्थी दुचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे या कारवाईत सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला. यापूर्वी वाहतूक विभागाने अनेकदा महाविद्यालय प्रशासनाला पार्कींगबाबत सूचना दिली होती, हे विशेष.
आधी ‘धूम’ स्टाईल बाईकस्वारांना आवरा
वणी शहरातील वाहतूक नेहमीच बेशिस्त असते. यातून अनेकदा अपघातही घडले आहेत. यात आता धूम स्टाईल बाईकस्वारांनी भर घातली आहे. ओठांवर मिसरूडही न फुटलेली कोवळी मुले वणीतील रस्त्यावरून धूम स्टाईल दुचाकी हाकत आहेत. मात्र याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. गुरूवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे सामान्य नागरिकांत समाधान व्यक्त होत असले तरी धूम स्टाईल बाईकस्वारांच्या मुसक्या कोण आवळणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याविरुद्धदेखील तातडीने मोहिम राबवावी, अशी मागणी होत आहे.