शापित फुलांच्या भुकेने शिवार हळहळले
By admin | Published: April 26, 2017 12:16 AM2017-04-26T00:16:33+5:302017-04-26T00:16:33+5:30
भूक म्हणजे प्रत्येकाच्या उदरी भडकणारा एक व्याकूळ डोंब. ज्यांनी भूक भोगली त्यालाच भुकेच्या वेदनाही कळतात.
व्याकूळ अनाथांच्या मदतीला धावली मानवता
संतोष कुंडकर वणी
भूक म्हणजे प्रत्येकाच्या उदरी भडकणारा एक व्याकूळ डोंब. ज्यांनी भूक भोगली त्यालाच भुकेच्या वेदनाही कळतात. शिवाराच्या वेदना डोईवर घेऊन जगणारा शेतकरीही त्यातलाच एक घटक. दातृत्वाचे संस्कारही त्यांच्यातच रुजलेले. अंगणात आलेल्या याचकाला पसाभर दान देताना त्यांचे हात कधीच मागे येत नाहीत. अशाच दातृत्वाचे शेकडो हात पुढे आलेत. त्यामुळे शापित फुलांच्या भुकेचा भीषण प्रश्न मिटला अन् या निष्पापांच्या चेहऱ्यावरचे हसू अधिकच बहरून आले.
ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट या संस्थेच्यावतीनं वणीत चालविल्या जाणाऱ्या आनंद बालसदनातील अनाथांच्या भुकेची ही व्याकूळ कथा कुणाही गहिवरून टाकेल अशीच आहे. बदनाम वस्तीत जन्म घेणारी ही मुलं या अनाथाश्रमात आश्रयाला आहेत. आपल्या वाट्याला जे काटेरी भोग आलेत, त्याच्या यातना आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत, ही भावना जपणाऱ्या वेश्या व्यवसायातील अनेक महिलांनी आपली मुले आनंद बाल सदनाकडे सोपविली आहेत.
यासोबतच काही अनाथ मुलेही या अनाथ आश्रमात वास्तव्याला आहेत. कोणतेही शासकीय अनुदान नसतानाही ही संस्था लोकांच्या मदतीतून या मुलांचे संगोपन करत आहे.
त्यांना शिक्षण देत आहे. अनंत अडचणींवर मात करत या संस्थेचा डोलारा पुढे जात आहे. याची जाणिव पंचक्रोशीला आहे. म्हणूनच एक नव्हे, दोन नव्हे तर १३६ शेतकऱ्यांनी पायली दोन पायली आणि देता आले तेवढे धान्य सोमवारी या संस्थेत आणून दिले अन् पाहता-पाहता चार क्विंटल गहू, दोन क्विंटल तांदूळ, ५० किलो तूर डाळ असे धान्य गोळा झाले. हटवांजरी येथील ४०, मंदर येथील ६६ व मारेगाव तालुक्यातील आवळगाव येथील ३० शेतकऱ्यांनी मुलांसाठी धान्याच्या तजविज केली. सोमवारी हे सर्व धान्य संस्थेच्या स्वाधीन करण्यात आले.
कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, उत्पादन अधिक झाले तर शेतमालाला भाव नाही. त्यामुळे कर्जाचे हप्तेही निटपणे फेडता येत नाही. एकीकडे या साऱ्या विवंचना भोगणारा हा शेतकरी दातृत्वासाठी मात्र कधीच मागे येत नाही. चिमण्या-पाखरांसाठी आपल्या शेतात ज्वारीचे तास लावणारा अन् पशुपक्षांना पिण्याच्या पाण्यासाठी हौद बांधणाराही हाच शेतकरी असतो. एका दाण्यातून हजार दाणे पिकविताना त्यातील काही दाणे गरजुंसाठी देण्याची दानत ठेवणाराही शेतकरीच असतो, हेच या दातृत्वातून दिसून आले.