तीन गावात चक्रीवादळ, दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:45 PM2018-06-20T23:45:12+5:302018-06-20T23:45:12+5:30
अचानक आलेल्या चक्रीवादळाचा प्रचंड फटका बाभूळगाव तालुक्यातील आलेगाव, आसेगाव देवी आणि वाई हातोला या गावांना बसला. मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजता सुमारे अर्धातासाच्या या तांडवात शेकडो घरांवरील टिनपत्रे उडून गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगावदेवी : अचानक आलेल्या चक्रीवादळाचा प्रचंड फटका बाभूळगाव तालुक्यातील आलेगाव, आसेगाव देवी आणि वाई हातोला या गावांना बसला. मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजता सुमारे अर्धातासाच्या या तांडवात शेकडो घरांवरील टिनपत्रे उडून गेली. तर घराचा सज्जा कोसळल्याने दोन जण ठार झाले. तर वादळात गावातील ११ जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोन महिलांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे. या वादळाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
बाभूळगाव तालुक्यातील आलेगाव येथे मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास प्रचंड वादळाला प्रारंभ झाला. क्षणात घरावरील टीनपत्रे पत्त्यासारखी उडू लागली. ८० घरांवरील टीनपत्रे एक ते दीड किलोमीटर परिसरात पडली. या वादळाने प्रत्येक जण भयभीत झाला होता. त्यातच पाऊस आणि गारांचा वर्षाव सुरू झाला. या वादळापासून बचाव करण्यासाठी झोपडी वजा घरातील नागरिकांनी पक्क्या घरांचा आधार घेतला. मात्र त्याही घरावरील टीनपत्रे उडून गेली. रवी वामन राठोड यांच्या घराच्या सज्याखाली पाच जण आश्रयाला थांबले होते. अचानक सज्जा कोसळला. त्यात सुधीर किसन राठोड (३५) हा जागीच ठार झाला. तर तुळशीदास परशराम राठोड (३६), उषा अनिल आडे (३०), सुमन नारायण पवार (५०) गंभीर जखमी झाले. तर गावातील सरलाबाई उकंडा चव्हाण (५५), सुभाष श्रावण पाटील (३६), किसना सकरु राठोड (५२), तौसिया नबीब पठाण (४), बिबी अब्दूल रशीद (७०), नगमा मंजूमबीन पठाण (४५), कमलाबाई सूर्यभान देशपांडे (६५), प्रवीण शालिक डेहणकर (३५), सईद शेख रफीक शेख (४५) सर्व रा. आलेगाव जखमी झाले. घरावरील टीनपत्रे उडाल्यानंतर दगड आतमध्ये कोसळल्याने ही मंडळी जखमी झाली. जखमींना तत्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीपैकी तुळशीदास राठोड याचा उपचारादरम्यान यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. तो शेतकरी होता. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई-वडील आहे. तर जागीच ठार झालेल्या सुधीर राठोड याच्या मागे एक मुलगा, पत्नी आहे. या वादळात सुमन नारायण पवार, उषा अनिल आडे यांची प्रकृती चिंताजनक आहे.
आसेगाव देवीलाही या प्रचंड वादळाचा तडाखा बसला. दोन घरे व तीन गोठे पूर्णत: उद्ध्वस्त झाले. ३५ घरांवरील टीनपत्रे उडून गेली. १२ घरांना अंशत: नुकसान झाले. हातोला येथील सात घरे आणि वाई येथील दोन घरांना या वादळाचा तडाखा बसला. आलेगावचे पोलीस पाटील जनार्दन रंगारी यांच्या बैलाच्या अंगावर दगड कोसळल्याने तो ठार झाला. या प्रचंड वादळात आलेगाव, आसेगाव देवी परिसरातील ५० च्यावर वीज खांब कोसळले. या वादळाची माहिती होताच उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांडगे, निवासी नायब तहसीलदार मेश्राम, पोलीस निरीक्षक व्ही.टी. देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक परशराम अंभोरे, जमादार सुरेश मोहाडे, पुरुषोत्तम सोडगिर, मंडळ अधिकारी एस.डी. गोळे, तलाठी जी.एन. गायकवाड, कुरसंगे, कृषी अधिकारी लक्ष्मण कलमोड आदींनी मंगळवारी रात्रीच गावात धाव घेतली.
आलेगाव ८०, आसेगाव ४७, वाईहातोलात १० घरांना तडाखा
आलेगाव परिसरात झालेल्या वादळात वर्धा-औरंगाबाद या उच्चदाब वाहिनीचे सात टॉवर अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. अजस्त्र टॉवर कोसळण्याची ही अलिकडच्या काळातील पहिलीच घटना असावी. वादळ सुरू होते त्यावेळी या टॉवरच्या ताराखालून एक ट्रॅक्टर जात होते. त्या तारा या ट्रॅक्टरवरच कोसळल्या. सुदैवाने वीज प्रवाह सुरु नसल्याने सर्वच जण बचावले.
‘वाचवा-वाचवा’च्या आर्त किंकाळ्या
आलेगाव येथे तब्बल अर्धा तास या वादळाने थैमान घातले. घरावरील टीनपत्रे पत्त्यासारखी उडत होती. घरात असलेली लहान थोर मंडळी जीवाच्या आकांताने आश्रय शोधत होती. वाचवा, वाचवा अशा आर्त किंकाळ्या फुटत होत्या. मात्र वादळाच्या या प्रचंड वेगात या किंकाळ्याही विरुन जात होत्या. प्रत्येक जण आश्रय शोधत असल्याने कुणीही कुणाच्या मदतीला धावत नव्हते.